Ashok Kharat: भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप असलेल्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) जामीन अर्जावर आज सोमवारी (दि. 31) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Court) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीत सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) मांडणार आहेत. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच या प्रकरणात प्रत्यक्ष न्यायालयात सरकारी पक्षासाठी युक्तिवाद करणार असल्याने आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी खरात सध्या अटकेत आहे. त्याच्या जामीन अर्जावर होणारी आजची सुनावणी महत्त्वाची मानली जात असून, सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जाण्याची शक्यता आहे.
Ujjwal Nikam: अॅड. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच मांडणार सरकारची बाजू
या खटल्यासाठी राज्य सरकारने जून महिन्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, राज्यातील इतर महत्त्वाच्या खटल्यांची जबाबदारी असल्याने निकम यांनी अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत प्रत्यक्ष न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडलेली नव्हती. आजच्या सुनावणीसाठी अॅड. निकम रविवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशोक खरातच्या जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Ashok Kharat: जामिनाला विरोधाची शक्यता
या प्रकरणात तपास यंत्रणेकडून पुरावे आणि साक्षीदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रकरणाची नियमित सुनावणीही सुरू आहे. अशोक खरातविरोधातील आरोपांचे गांभीर्य, तपासाची सद्यस्थिती आणि उपलब्ध पुरावे यांचा आधार घेत सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम स्वतः सरकारी पक्षाची बाजू मांडणार असल्याने न्यायालयातील युक्तिवादाकडे विशेष लक्ष लागले आहे.
Ashok Kharat: अशोक खरातविरोधात तब्बल 17 गुन्हे दाखल
अशोक खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यापैकी 12 गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे आहे. अशोक खरातने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता सरकार पक्षाकडून अॅड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद हा आजच्या सुनावणीचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. न्यायालय जामीन अर्ज मंजूर करते की फेटाळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
