परभणी : वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन लोकांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून पैसे गोळा करत अनेक कार, दुचाकी पळवणाऱ्या एका भामट्या महाराजास परभणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलीय. त्यांच्याकडुन 3 कार, एक बुलेट व बंदी घातलेल्या जुन्या एक लाख 15 हजारांच्या नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
लोणावळ्यातील कुसगाव येथील बबन सखाराम थोरात उर्फ माऊली महाराज याने पुण्यातील एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे घेण्यासाठी तो व्यक्ती पुण्यातील सचिन टिळेकर यांची इनोव्हा कार भाड्याने घेऊन परभणीच्या पूर्णेत माऊली महाराजांकडे आला, तेव्हा महाराजांनी मी आता पैसे घेऊन येतो म्हणत कार घेऊन पोबारा केला. ही घटना घडल्यानंतर टिळेकर यांनी पुर्णा पोलिसांत तक्रार दिली. परभणी पोलिसांनी माऊली महाराजांची माहिती घेत अटकेसाठी पथकं पाठवली. तेव्हा या भामट्या महाराजाने पोलिसांना अनेकवेळा हुलकावणी देत पोबारा केला. मात्र, शेवटी परभणी-सेलू महामार्गावर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे वेगवेगळे पत्ते असल्याचे ओळखपत्र सापडले आहेत. माऊली महाराज हा सुरुवातीस ओळख करून घेऊन सहवासात राहतो व कालांतराने पैसे उसने घेतो. त्यानंतर पैसे देण्याबाबत तगादा लावला असता तो पैसे देण्यास विलंब लावतो. त्यानंतर त्यांचा गैरफायदा घेऊन मी गुप्तधन काढले आहे किंवा पैश्याचा पाऊस पाडला आहे, मी तुमच्याकडून उसने घेतलेले पैसे डबल परत करतो, असे सांगून निर्जनस्थळी कार वा मोटारसायकल घेऊन येण्यास सांगायचा. त्यानंतर मी थोड्याच वेळात घरी ठेवलेले पैसे घेऊन येतो, असे सांगून कार वा मोटारसायकल घेऊन जातो व परत येतच नाही, अशा प्रकारे त्याने अनेकांना फसवून संबंधिताची कार, मोटारसायकल हे वाहन लांबवण्याचे प्रकार तपासातून समोर आले आहे.
परभणी पोलिसांनी त्याने केलेल्या 4 गुन्ह्यांची उकल केली असुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महाराजाने कर्नाटक पासिंगची एक I 20 कार, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक बुलेट, पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून इनोव्हा कार त्याचबरोबर वसमत पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलही एका गुन्ह्याची उकल करण्यात परभणी पोलिसांना यश आले आहे. त्याचा साथीदार कृष्णा गुलाब येडे (रा.डाकेफळ, ता.घनसावंगी) यासही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या एक लाख 15 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकरणात परभणी पोलिसांनी अद्याप तीन आरोपींना अटक केली आहे. यात पुढील तपासात असेच अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भागोजी चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, फौजदार संतोष सिरसेवाड, फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, किशोर चव्हाण, दिलावर पठाण, सय्यद मोबीन, शेख अजहर, संतोष सानप, अनिल कोनगुलवार, बिक्कड, छगन सोनवणे, मुरकुटे, गणेश कौटकर, राम घुले, विजय जाधव, गिरीश चन्नावार, अक्षय वाघ आदींच्या पथकाने केली आहे.