Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामागील कारण असे की, समृद्धी महामार्गाने (Samriddhi Highway) प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी पुन्हा एकदा लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. काल रात्री पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रमेश पाटील नावाच्या एका व्यावसायिकास बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक समृद्धी महामार्गावर लुटण्यात आलंय. या घटनेत या व्यवसायिकास चाकू मारून गंभीर जखमी देखील करण्यात आले आहे.
सोबतच त्यांच्या जवळ असलेली रोख रक्कम, आयफोन, आणि चार तोळे सोने लुटून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केलाय. यात गंभीर जखमी झालेल्या व्यापार्यावर सध्या वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या 20 दिवसातली ही सलग दुसरी घटना असून यामुळे मात्र समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
समृद्धी महामार्गावर पुन्हा प्रवाशाला दरोडेखोरांनी लुटलं
समृद्धी महामार्गावर 10 मे रोजी लुटमारीच्या घटनेनंतर पुन्हा वीस दिवसांनीच डोणगाव परिसरातच ही घटना घडल्याने समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर आणि मुंबई कॉरिडॉरवरील डोणगाव जवळ दोन्ही बाजूने पेट्रोल पंप असल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालक या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात. नेमका याचाच फायदा घेऊन चोरटे वाहनधारकांना लुटत असल्याच्या घटना घडत आहेत. काल, शुक्रवारच्या रात्री अशीच एक घटना उजेडात आली आहे. यात सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत रमेश पाटील यांना लुटले आहे.
यावेळी त्यांनी विरोध केला असता त्यांच्यावर चाकू हल्ला देखील करण्यात आला आहे. परिणामी जीवावर बेतणारा हा प्रसंग बघता रमेश पाटील यांनी नाईलाजाने जवळ असलेले पैसे, मोबाइल, सोने देऊन स्व:ताचा जीव वाचवला आहे. या अज्ञातांचा उद्देश सफल होताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. हे प्रकरण उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून समृद्धी महामार्गावर पुन्हा अशी घटना घडल्याने पुन्हा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
20 दिवसातली दुसरी घटना
अशीच एक घटना 10 मेला घडली होती. यात समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या कारने (कार क्रमांक MH 12 JC 1919) मुंबईकडे जात होतं. या प्रवासादरम्यान रात्री 3-3.30 वाजेच्या सुमारास कारचाारकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ति त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर सशस्त्र दरोडेखोरांनी कार मधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. या कुटुंबाचा नाईलाज असल्याने त्यांनी भयभीत होऊन होतं नव्हतं ते सारं त्यांच्या स्वाधीन करून जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. तसेच सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये त्यांच्या स्वाधीन केले.
इतर महत्वाच्या बातम्या