अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही नाव घेण्यात आलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील (Akola News)  सिव्हील लाईन पोलिसांत घडलेल्या घटनेबाबत जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानुसारच माझ्यावर हल्ला दाखल हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये मनसे (MNS) सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मिटकरी यांनी राज ठाकरेंचं नाव घेतल्याने आता मनसे व राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतं. 


अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि प्रदेश सरचिटणीस कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्याचं समर्थन करत, त्या मनसैनिकांचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, अमोल मिटकरी यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या घातला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं मिटकरी यांनी म्हटलं. 


मिटकरी यांनी फिर्याद देताना म्हटले की, माझ्यावर हल्ला चढवणाऱ्या मनसे कार्यकर्ते यांचेवर कठोर कार्यवाही करणे बाबत महोदय, मी समक्ष पोलीस स्टेशन सिव्हील लाइन अकोला येथे हजर लेखी रिपोर्ट देतो की, मी विधान परीषद सदस्य विधी मंडळ महाराष्ट्र राज्य (आमदार) सन 2020 पासुन नियुक्त आहे. आज दि 30/07/24 रोजी दुपारी 02/30 वा विधी मंडळ कामकाज संदर्भातील कागदपत्राचा आढावा तसेच सामान्य शेतक-याचे प्रश्न सोडवायला शासकीय विश्रामगृह अकोला येथील गुलमोहर कक्षात बसलो असता विश्राम गृहाचे नविन इमारतीमधुन मनसे विधानसभा निरिक्षक कर्णबाळा दुनबळे याने स्थानिक व बाहेरच्या काही पदाधिकारी व महिलांना चिथावणी देवुन माझेवर हल्ला करायचे आदेश देताना असे म्हटले की, राज ठाकरे साहेबांनी या आमदाराला मारुन टाका असे सांगुन जमावाला चिथावणी देवून मी असलेल्या गाडीचा पाठलाग करत माझे ड्रायव्हरवर नामे शैलेश दादाराव वानखडे व माझेवर नारेबाजी करत दगड घेत कुड्यां हातात घेवुन शिवीगाळ करुन मारुन टाका अशी घोषणाबाजी केल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. 


परिवारालाही जिवंत मारण्याची धमकी


माझ्या गाडीवर हल्ला चढविला सुदैवाने मी आत गुलमोहर हालचे अन्टी चेंबरमध्ये बसलो असल्याने वाचलो, मात्र ही झुंड तितक्यावरच न थांबता अकोला जिल्हा मनसे अध्यक्ष टोळी प्रमुख पंकज साबळे व सिंचन गालट, अरविंद शुक्ला, ललीत यावलकर, जय मालोकार, मंगेश देशमुख, सौरभ भगत, रुपेश तायडे, दिपक बोडखे, मुकेश धोदफडे, गणेश वाघमारे व सौ प्रशंसा अंभेरे व काही महिला व त्याचे कार्यकर्ते सोबत तब्बल 50 ते 60 गुंडाची टोळी शासकीय इमारतीत घुसुन अतत एक तास धुडगूस घालत होती व बाहेरुन संध्याकाळी तुझ्या परीवाराला हल्ला करून बदला घेवु व तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी कर्णबाळा देत होता, असेही मिटकरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.