कोल्हापूर : कोल्हापुरमधील एक धक्कादायक माहिती (Kolhapur Crime News) समोर आली आहे. एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (Asmita Katkar Death Case) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
Kolhapur Crime News: मुलीच्या बारशासाठी 52,000 हजार रुपयांचा पाळणा
आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबीयांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप देखील अस्मिता यांच्या आई वडिलांनी केला आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते. परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला, असा आरोपही अस्मिताच्या आई-वडिलांनी केला. (Kolhapur News) तर विवाहिता अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती प्रतिकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर अशा चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू, सासरे या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Kolhapur Crime News: वारंवार पैसे उकळल्याची पोलिसांची माहिती
अस्मिता काटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची आई संगीता अजित सरदेसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्मिता काटकर यांच्या आई-वडिलांकडून काटकर कुटुंबीयांनी वारंवार पैसे उकळल्याची पोलिसांची माहिती आहे. आणखी पैशाच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून अस्मिता काटकर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची देखील पोलिसांनी माहिती दिली आहे.
Kolhapur Crime News: नेमकं प्रकरण काय?
वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (माहेरचे नाव अस्मिता अनिल सरदेसाई) (वय २३, रा. काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. १२) दुपारी चारच्या सुमारास घडली. सीपीआरमधील पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता हिचे माहेर लाटगाव (ता. आजरा) असून, तिचे शिक्षण गोव्यात झाले. वर्षभरापूर्वी तिचे प्रतीकसिंह काटकर यांच्याशी लग्न झाले. गेल्या महिन्यात तिची प्रसूती झाली. दोन दिवसांत मुलीला एक महिना पूर्ण होत असल्याने घरात तिच्या बारशाची लगबग सुरू होती. रविवारी दुपारी सासू, सासरे आणि पती बारशासाठी हॉल बघायला गेले होते. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करून तिने बेडरूममधील छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेतला. पती आणि सासू, सासरे घरी पोहोचल्यानंतर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. हाका मारून, मोबाइलवर कॉल करूनही पाहिला. दरवाजा उघडला जात नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता, अस्मिता यांनी गळफास घेतल्याचे दिसले
गळफास सोडवून तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्क येथे पाठवण्यात आला. आत्महत्येची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांनी काटकर यांच्या घरी जाऊन पाहणी केली. घटनेची नोंद घेण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.
