अकोला : आयुष्याच्या संध्याकाळी स्वैराचार करणाऱ्या 72 वर्षांच्या एका आजोबाला कायद्याने चांगलाच हिसका दाखविला आहे. आयुष्यातील शेवटच्या काळात ईश्वरभक्तीत रमण्याऐवजी या आजोबांना तुरूंगात खडी फोडावी लागणार आहे. साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 72 वर्षीय आजोबास अकोला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच तीन लाखांचा दंडही आरोपी म्हाताऱ्याला ठोठावला आहे. यादव अर्जुन डोंगरे असं जन्मठेप झालेल्या आरोपी आजोबांचं नाव आहे. आरोपी अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातल्या आसरा गावाचा आहे. ही घटना 18 नोव्हेंबर 2018 ला घडली होती. पीडित चिमुकली आपल्या आजीसोबत अकोल्यात रहात होती. घटनेच्या दिवशी आजी काही कामानिमित्त बाहेर गेली होतीय. यावेळी नराधम आजोबाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांत गुन्हा दाखल होता.
त्या दिवशी नेमके काय झाले होते?
ही घटना आहे 11 नोव्हेंबर 2018 च्या दुपारची. अकोला शहरातील जठारपेठ भागात ही साडेतीन वर्षांची पिडीत चिमुकली तिच्या आजीसोबत राहत होती. 11 नोव्हेंबर 2018 रोजी तिची आजी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी यादव अर्जुन डोंगरे हा चुलत आजोबा घरी होता. यादव हा अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातल्या आसरा गावाचा आहे. चिमुकलीची आजी बाहेर गेल्यावर 72 वर्षीय नराधम आजोबाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेची आजी घरी परतली असता तिला नात रडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आजीने तिला का रडत आहे, अशी विचारणा केली असता नातीने पोटात प्रचंड वेदना होत असल्याची माहिती आजीला दिली. त्यानंतर आजीने आजूबाजूच्या महिलांनाही माहिती दिल्यानंतर मुलीवर तिच्या आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. दरम्यान, आजीने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम आजोबाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 376 (2) फ, तसेच पोस्को कायद्याच्या कलम 3, 4,5 (एम) (एन), 6 अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या अचूक तपासामुळे चिमुकलीला मिळाला न्याय
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रणिता कराळे व सहायक पोलीस निरीक्षक विशाल नांदे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पोस्को कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने आरोपी आजोबास बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पिडीत चिमुकलीला दिड लाख देण्याचे आदेश
आरोपीला जन्मठेपेसोबतच तीन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. तीन लाखाच्या दंडापैकी एक लाख 50 हजार रुपयांची रक्कम पीडितेला देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे.