Akola Crime News : मोठी बातमी! बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी; सिग्नल ॲपद्वारे 2 कोटींची मागणी
Akola Crime News : अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi) अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

Akola Crime News : अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi) अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. सिग्नल ॲपद्वारे भाजपच्या पाधिकाऱ्याला बिश्नोई गँगमधील शुभम लोणकरने (Shubham Lonkar) 2 कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिश्नोई गँगने 2 कोटीची हि खंडणी मागितली आहे. अकोट मतदारसंघांचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharsakale) यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे, अशी भाजपच्या शहराध्यक्षाला धमकी दिलीय.
Lawrence Bishnoi Gang Threat : 2 कोटी वसूल करून दे, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेईल
दरम्यान, या संबंधित अत्यंत गोपनीय पद्धतीने आलेल्या धमकीसंदर्भात अकोला पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. भाजप संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला बंदूकधारी पोलिसांची सुरक्षा मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. साधारणत तीन ते चार दिवसांपूर्वी एका ॲपद्वारे धमकीचा कॉल आला होता. आमदार भारसाकडे यांच्याकडून दोन कोटी रुपये वसूल करून द्यावे, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेईल, अशी धमकी बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर याने भाजपच्या शहराध्यक्षाला दिली असल्याची माहिती समोर येतीये. मात्र, या संदर्भात जास्त माहिती नसल्याचं अकोला पोलिसांकडून सांगितण्यात आलंय. असं असलं तरी आकोट शहरात अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
Shubham Lonkar : कोण आहे शुभम लोणकर?
या आधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर आहे. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी आहे. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते.
शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होता. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती. शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहेये. त्यांचं अकोल्यातील नेव्होरी गांवात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागलं आहेय. तर रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील शुभम लोणकर याने स्वीकारली होती.

























