कोरोना काळात रुग्णाच्या मनाविरुद्ध उपचार, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट; नगरच्या 5 नामांकित डॉक्टरांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच रुग्णांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

Ahilyanagar News: कोरोना काळात रुग्णाच्या मर्जीविरुद्ध उपचार करून घेतल्याचा, अवाजवी बिल आकारल्याचा, तसेच मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप शहरातील पाच नामांकित डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबच्या तज्ञ डॉक्टरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Ahilyanagar Crime News)
या प्रकरणात न्यूक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अशोक खोकराळे यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आला असून, त्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
खोकराळे यांच्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने उपचारासाठी न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णाच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने अॅडमिट करून घेतल्याचा, त्यांच्या आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आल्याचा आणि जाणीवपूर्वक जास्त प्रमाणात औषधे दिल्याचा आरोप आहे. तसंच रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारण्यात आल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्याबाबत योग्य माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मृतदेहाचे ठसे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या आरोपांनंतर तोफखाना पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच रुग्णांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
'वडिलांच्या मृत्यूची माहितीही दिली नाही...'
तक्रारदार अशोक खोकराळे यांनी सांगितले, कोरोना काळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला तरी आम्हाला त्याबद्दल योग्य माहिती दिली गेली नाही. आम्ही अनेकदा हॉस्पिटलशी संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी न्याय मिळवण्यासाठी आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली.या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. या गुन्ह्यामुळे शहरात वैद्यकीय व्यावसायिकांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली असून, रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


















