Ahilyanagar Crime : अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Government Technical College) वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्याने विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभागप्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देऊन  अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. अमित खराडे असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या अमित खराडे याने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभाग प्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. 

विद्यार्थिनीला कॉलेजच्या गोडाऊनमध्ये नेले अन्...

कॉलेजच्या गोडाऊनमध्ये घेऊन जात संबंधित विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल अस वर्तन आरोपीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या आरोपीने दोन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार केल्याचे समोर आले असून अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात 

आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित दोन विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आपल्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला आणि या विद्यार्थिनीने धाडस करत 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

बांधाच्या वादातून शेतकऱ्यांवर हल्ला 

दरम्यान, बाराबाभळी (ता. अहिल्यानगर) शिवारात सोमवारी बांधाच्या वादातून सुरू झालेल्या भांडणात एका शेतकऱ्यावर लोखंडी टामीने हल्ला करण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले असून, महिलांवरही हात उचलण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सोनु रावसाहेब वाघस्कर यांनी याबाबत फिर्याद दिली. तुषार आण्णा कापसे, विशाल आण्णा कापसे, सौरभ विठ्ठल कापसे व विठ्ठल माधव कापसे (सर्व रा. बाराबाभळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सोनु वाघस्कर हे त्यांच्या आईसोबत शेतात कांदे उपटत असताना, संशयित आरोपींनी शेतीच्या बांधाच्या वादातून शिवीगाळ करत हल्ला चढवला. यावेळी तुषार कापसे याने लोखंडी टामीने सोनु वाघस्कर यांच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली, तर इतर संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडवायला आलेल्या सोनु यांची आई कुसुम यांना देखील संशयित आरोपींनी मारहाण केली.

आणखी वाचा 

Nashik Satpeer Dargah: नाशिकमध्ये अनधिकृत सातपीर दर्गा रातोरात हटवला, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात