Ahilyanagar Acid Attack Case: अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात सहावीत शिकाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरूणाकडून ॲसिड हल्ला (Ahilyanagar Acid Attack Case) केल्याची धक्कादायक घटना घडली. वडगाव पान शाळेमधील ही विद्यार्थिनी घरी जात असताना, अचानक तिच्यासमोर विकृत आला आणि त्याने थेट चिमुरडीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. या हल्ल्यानंतर विकृत हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.
शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असून अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. हल्ला करणारा आरोपी अनोळखी असल्याची पहिली प्रतिक्रिया हल्ला झालेल्या मुलीने दिली आहे. तर नातेवाईकांनी आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वडगावपानमधील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होणार आहे. (Ahilyanagar Acid Attack Case)
मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा- (Ahilyanagar Acid Attack Case)
लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या असून आरोपीला पकडण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी विविध पथक स्थापन करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.
शाळेसाठी रोज सायकलवरुन प्रवास- (Ahilyanagar Acid Attack Case)
घरापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत सदर मुलगी सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती. घरापासून शाळेत जाण्यासाठी रोज दोन किमी सायकवरून प्रवास करायला लागायचा. शाळेतून सायकलवरून परतत असताना मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. घराजवळील रस्त्यावर कमी घर असल्याने आरोपीने कृत्य केल्याचं दिसून येतंय.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? (Rupali Chakankar On Acid Attack)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आज सकाळी सहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी शाळेनंतर घरी जात असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. सायकल वरून घरी येणाऱ्या मुलीला रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्यात आलं. 11.30 ते 11.45 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. नागरिकांनी जखमी मुलीला डॉक्टर जम्बुकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले नंतर लोणी इथल्या रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याचे बाजूने 7 टक्के भाजलेला आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सांगितले. जखमी असलेल्या मुलीकडे पोलिसांनी प्राथमिक विचारपूस केली आहे आणि उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीचा जबाब, प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेली माहिती या सगळ्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू केला आहे. मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथे ही तपास सुरू केला आहे. मी स्वतः या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिल्या.
