मुंबई : राजधानी मुंबईतील मोठं रेल्वे जंक्शन आणि कायम गर्दीनं गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर चक्क एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी तुतारी एक्सप्रेसने (Railway) प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. प्रथम दर्शनी आरोपी प्रवाशांच्या हालचालीवरुन संशय आल्याने रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता बॅगमध्ये मृतदेह असल्याचे निष्पण्ण झाले आहे. मुंबईतील (Mumbai) पायधुनी परिसरात ही हत्या घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुनी पोलिसांकडे (Police) वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे पोलिसांमुळे अवघ्या चार तासांत या गुन्ह्याची उकल (Crime) करण्यात पायधुनी पोलिसांना यश आलं आहे. मात्र, आरोपी हे मुकबधीर असल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी जबाब नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी साईन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 11 येथे दोन मूकबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होते. या दोघांकडे चाकं असलेली एक बॅग होती. मात्र, ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना या दोघांची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या वजनामुळे दोघांनाही बॅग रेल्वे गाडीत चढवताना चांगलाच घाम फुटला होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते. त्यांना या दोन्ही व्यक्तींची हालचाली बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. ही बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (वय 30) याचा असल्याचे समजले.
अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला होता. शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिरांनी सादिक अली शेखची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याच्या मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायचे ठरवले होते. त्यासाठी दोघांनी अर्शदचा मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्स्प्रेसने कोकणात निघाले होते. मात्र, पोलिसांनी संशय येऊन त्यांनी दोघांना हटकल्याने हा सगळा प्रकार उघडकीला आला.
साईन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली
4 ऑगस्ट रोजीची घटना असून तुतारी एक्सप्रेससाठी आमचा बंदोबस्त लागला होता. त्यावेळी, जनरलच्या डब्ब्याजवळ एक संशयित व्यक्ती मोठी बॅग घेऊन जात होता. विशेष म्हणजे ती बॅग त्या व्यक्तीला उचलली देखील जात नव्हती. त्यामुळे, आमचा संशय बळावला आणि आम्ही त्याची चौकशी केली. आरोपी मुकबधीर असल्याचेही आरपीएफच्या तपासातून समोर आले. त्यामुळे, साईन लँग्वेज एक्सपर्टच्या मदतीने चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे यांमधून आरोपीकडून पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेतली.
पायधुणी परिसरातून टॅक्सी करुन ते हा मृतदेह घेऊन दादर रेल्वे स्टेशनवर आले होते. यापुढील तपास पायधुणी स्थानिक पोलीस करत आहेत, असे मध्ये रेल्वेचे डीएसपी ऋषीकुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
दुसऱ्या आरोपीलाही केली अटक
प्राथमिक तपासात शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून अर्शद अली शेख याची हत्या केल्याचे समजले. शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून ताब्यात घेतले. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. आता, याप्रकरणाची पुढील तपासणी करुन पोलिसांकडून शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांवर आरोपपत्र दाखल करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.
हेही वाचा
आधी फोटो घेतला, मग पाण्यात उतरले; 12 वीत शिकणारे 4 मित्र बुडाले, सुदैवाने 1 बचावला