कल्याण : लॉकडाऊनच्या काळात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचं चुंबन घेतल्याचा प्रकार कल्याणच्या शहाडमध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल पाच महिन्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 14 मे रोजी शहाड परिसरात हा प्रकार घडला होता.


या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी 14 मे रोजी संध्याकाळी शहाड परिसरात पायी जात होती. याचदरम्यान दुचाकीवरून तिथून जाणाऱ्या एका इसमाने एका इसमाने तिला लिफ्ट देऊ केली. मे महिन्यात लॉकडाऊनमुळे वाहतुकीचं कुठलंही साधन उपलब्ध नसल्यानं हा इसम आपली मदत करत असल्याचं समजून ती मुलगी या इसमासोबत दुचाकीवर बसली. मात्र, तिला सोडल्यानंतर या इसमाने या मुलीचं चुंबन घेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता या इसमाने तिला मारहाणही केली. यामुळे पीडित मुलगी घाबरून रडायला लागली. यावेळी या इसमाने पीडित मुलीचा फोन घेऊन स्वतःच्या एका नातेवाईकाला फोन केला आणि तिथून पळ काढला.


पैशाच्या हव्यासापोटी मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास मदत; आरोपी पती गजाआड


या सगळ्यानंतर पीडित मुलीने खडकपाडा पोलीस स्टेशन गाठत या सगळ्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार विरोधी कलमान्वये गुन्हाही दाखल केला. मात्र, कुठलाही धागादोरा नसल्यानं पोलिसांसमोर या गुन्ह्याच्या तपासाचं मोठं आव्हान होतं. अखेर या तरुणीच्या फोनवरून ज्या नंबरवर आरोपीने फोन केला होता, याची माहिती पोलिसांनी काढली. सदर नंबर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांना समजलं. मात्र, आरोपीची तिथून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो व्हॉट्सऍपवर मागवून घेत तो पीडित तरुणीला दाखवला. हा आरोपीचाच फोटो असल्याचं तरुणीने सांगितल्यानंतर या आरोपीचा मग काढायला सुरुवात केली.


यावेळी या आरोपीचं नाव अफसर शेख असून तो कल्याण पूर्वेतल्या कोळसेवाडी भागात राहणारा असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवत त्याला तब्बल 5 महिन्यांनी 3 ऑक्टोबर रोजी बेड्या ठोकल्या. तांत्रिकदृष्ट्या केलेल्या तपासामुळे या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. कोकाटे, प्रीतम चौधरी, महिला पोलीस हवालदार संगारे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ या पथकाने हा गुन्हा उघड केला.


Nalasopara Police | नालासोपाऱ्यातील तरुणीच्या आत्महत्येला पोलीस जबाबदार, मृत मुलीच्या कुटुंबाचे आरोप