Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील मानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Shivsena UBT Pradeep Purnekar) यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येने ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकाला अटक केली असून 2 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात एकूण 5 आरोपी असून इतर 4 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी संताप व्यक्त करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय, असा संताप आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. या हत्येतील गुन्हेगारांना आणि त्यामागील शक्तीला ताबडतोब अटक होईल अशी अपेक्षा करतो. तसंच, पुर्णेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तांना ह्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय? (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर काल रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोवर प्रदीप पूर्णेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पूर्णेकर कुटुंबानं घेतली आहे.
