Nashik Crime : दिवाळीत (Diwali) खऱ्याखुऱ्या बंदुकीतून हवेत गोळीबार (Firing) करुन याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणं नाशिकमधल्या (Nashik) एका तरुणाला महागात पडलं आहे. नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सातपूर-गंगापूर लिंक रोडवरील ध्रुवनगर परिसरात हा तरुण राहतो. तो परप्रांतीय असल्याचं समजतं.
दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी हवेत गोळीबार, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट
आकाश आदक असं या तरुणाचं नाव आहे. मागील वर्षी दिवाळीत म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याने घराबाहेर रहिवासी परिसरात बंदुकीतून हवेत गोळीबार केला. तसंच या घटनेचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियात व्हायरल केला होता. केवळ आनंद म्हणून गोळीबार केला होता. परंतु सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
दीड लाख रुपयांच्या बंदुकीसह तरुणाला बेड्या
नाशिक गुन्हे शाखेचेच पोलीस कर्मचारी असलेले प्रशांत मरकड यांच्या निदर्शनास हा व्हिडीओ आला होता. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्हायरल व्हिडीओबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतानाच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आकाशला दीड लाख रुपयांच्या बंदुकीसह घरातून अटक करण्यात आली आहे. परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याने त्याच्यावर गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तरुण हा परप्रांतीय आहे. तो ज्या राज्यातील आहे तिथे सण आणि इतर कार्यक्रमात फायरिंग करणं सामान्य बाब मानली जाते. मात्र, महाराष्ट्रात तशी परवानगी नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदूक मामाची असल्याचं चौकशीतून समोर
दरम्यान तरुणी ज्या बंदुकीतून गोळीबार केला ती कुठून आणि का खरेदी केली होती, याची चौकशी केली असता, संबंधित बंदूक ही त्याच्या मामाची असल्याचं समोर आलं आहे. तरुणाचे मामा एक्स सर्विसमन आहेत. त्यांच्याकडे पिस्तुलाचा शस्त्र परवाना आहे. तरुणाने घरातील बंदूक घेऊन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेत गोळीबार केला. पोलिसांकडून परवानाधारक मामाचीही चौकशी केली जात आहे.
गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, नाझिमखान पठाण, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, महेश साळुंखे, मुख्तार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. आकाश आदकविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.