Kolhapur Crime: छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं समाजमन हळहळत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जयसिंगपुरात आईने आपल्या दोन निष्पाप चिमुरड्यांना गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संगीता गाडीवडर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, प्रगती गाडीवडर (वय 4 वर्षे) आणि प्रतीक गाडीवडर (वय दीड वर्षे) अशी मृत निष्पाप मुलांची नावे आहेत.

Continues below advertisement

दोन्ही मुलांना गळफास दिला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयसिंगपूर परिसरातील संगीता गाडीवडर यांनी आधी मुलगी प्रगती आणि लहानगा मुलगा प्रतीक या दोघांना छताला गळफास दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी स्वतःही गळफास घेत आपले जीवन संपवले.आईने इतके टोकाचे पाऊल का उचलले, आत्महत्येमागे कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

लेकाच्या वाचवण्याच्या नादात तिघांचा जीव गेला

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवघ्या 18 वर्षाच्या लेकाला आत्महत्या करण्यपासून वाचवण्याच्या नादात वडिल आणि मुलाचा सुद्धा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात सन्नाटा पसरला आहे. वडिल आणि मुलगा डोंगरावरून कोसळताना दिसताच आईने सुद्धा उडी घेत जीवनयात्रा संपवली. त्यामुळे काही तासांपासून सुरु असलेल्या प्रकारात अवघ्या कुटुंबाचा सत्यानाश 30 मिनिटात झाला. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19 वर्षे), वडील मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48 वर्षे) आणि आई संगीता मुरलीधर चांदगुडे (वय 42 वर्षे) यांचा जीव गेला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगावचे असलेले हे चांदगुडे कुटुंब सध्या झाल्टा फाटा परिसरातील अक्षयबन सोसायटीमध्ये वास्तव्यास होते.

Continues below advertisement

नाहीतर मी मंगळसूत्र तोडते

डोंगराच्या अतिशय धोकादायक कड्यावर कुणाल उभा होता. त्याला खाली उतरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी "तुला नवीन आयफोन 15 प्रो घेऊन देतो, तू मागं ये" अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर आई संगीता यांनी जमिनीवर डोके टेकवून, पदर पसरून, "तुझ्या पाया पडते, तू मागं ये, नाहीतर मी मंगळसूत्र तोडते" अशी काळीज चिरणारी आर्त हाक दिली. मात्र, नैराश्याच्या भरात असलेल्या कुणालने कुणाचेही ऐकले नाही. तीन तासांच्या विनवणीनंतर कुणालने दरीत झोकून दिले. त्याला वाचवण्यासाठी पुढे धावलेले वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते कुणालसोबत खोल दरीत कोसळले. आपल्या डोळ्यांसमोर एकुलता एक मुलगा आणि पती दरीत पडल्याचे पाहून आई संगीता यांचा धीर सुटला आणि त्यांनीही क्षणाचाही विचार न करता त्याच कड्यावरून दरीत उडी घेतली. काही सेकंदांतच तीन जीवांचा अंत झाला आणि संपूर्ण चांदगुडे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. 

इतर महत्वाच्या बातम्या