नागपूरः नागपुरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुझ्यासाठी सरप्राईज असल्याचे सांगून चिखलदरा येथे नेऊन पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. नागपुरात परतल्यावर तिने आई-वडीलांना आपबिती सांगितल्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्या उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. ही घटना 13 जुलै रोजी घडली.
नागपुरातील नक्षलविरोधी अभियानात कार्यरत असलेल्या प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (वय 35, रा. फ्रेन्ड्स कॉलनी, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नक्षलविरोधी अभियानात तो पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वीच ओळखीत असलेल्या 17 वर्षीय मुलगी त्याच्या संपर्कात आली. ती 12 वी मध्ये शिकते. तो तिचा केअरटेकरही होता हे विशेष. त्याचा फायदा घेत त्याने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असल्याचे सांगून 13 जुलैला चिखलदरा येथे चारचाकी वाहनात नेले. तिथे एका लॉजवर नेले. दरम्यान त्याने ज्युसमधून गुंगीचे औषधही दिले. या दरम्यान त्यांनी दारूचेही सेवन केले. यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला आपल्यासोबत अत्याचार झाल्याची बाब लक्षात आली. तिने विरोध केला. मात्र, ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतरही त्याने तिला निर्वस्त्र करीत, फोटो काढून स्वतःजवळ ठेवले. तसेच ते व्हायरल करीत, बदनामी करण्याची धमकी दिली. नागपुरात परत आल्यावर मुलीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्यातून त्यांनी पोलिस ठाणे गाठून प्रदीपकुमार विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पॉक्सो अंतर्गत आरोपीला अटक केली आहे.
यापूर्वीही चौघां पोलिसांविरुद्ध गुन्हा
अत्याचार करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक हा विभागातील पाचवा पोलिस ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत लग्नाचे आमिष देत सातत्याने बलात्कार करणाऱ्या हेमंत हिरामण कुमरे या पोलिस शिपायावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. तो लकडगंज वाहतूक विभागात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होता. तसेच जरीपटका येथे एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय गुडकेश्वर पोलिस ठाण्यात एका पोलिस उपनिरीक्षकावर तर गिट्टीखदान येथे पोलिस ठाण्यात, आणि नंदनवन येथील एका पोलिस निरीक्षकावरही गुन्हा दाखल आहे.