Pradhan Mantri Awas Yojana : गरीबांना हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना (PMAY Scheme) सुरु करण्यात आली. मात्र, पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 विवाहित महिला नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील 11 विवाहित महिला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) हफ्ता मिळाल्यानंतर त्यांच्या प्रियकरांसह पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. पीएम आवास योजना गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी मदत करण्यासाठी सरकारद्वारे चालवली जाते.


पहिला हफ्ता घेऊन प्रियकरासोबत फरार


या सर्व महिला उत्तर प्रदेशातील मूळच्या महाराजगंज जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. या महिलांनी पीएम आवास योजनेंतर्गत 40,000 रुपयांचा पहिला हप्ता बँक अकाऊंटमध्ये जमा होताच प्रियकरांसोबत पळ काढला. या विवाहित महिला त्यांच्या पतींना सोडून पैसे घेऊन बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या. या महिलांच्या पतींनी या घटनेबाबत एफआयआरही दाखल केला आहे. 


प्रियकरासोबत पळाल्या 11 महिला


मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील सुमारे 2,350 लाभार्थ्यांना अलीकडे पीएम आवास योजनेअंतर्गत (PMAY) पहिला हफ्ता मिळाला आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत थुठीबारी, शितलापूर, चटिया, रामनगर, बकुल दिहा, खसरा, किशूनपूर आणि मेधौली गावातील लाभार्थ्यांना योजनेचा निधी मिळाला. लाभार्थ्यांपैकी 11 महिला या योजनेचा पहिला हफ्ता घेऊन फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. 


लाभार्थ्यांचा दुसरा हफ्ता थांबवण्याचा निर्णय


PMAY योजनेचा एक भाग म्हणून, सरकार गरीब कुटुंबांना कुटुंबाच्या उत्पन्नानुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देते. संबंधित अधिकाऱ्यांना पैसे दिलेल्या कुटुंबाबाबत कोणताही अनुचित प्रकार किंवा गडबड आढळल्यास, ते लाभार्थींकडून रक्कम परत मागू शकतात. काही मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेमुळे पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे पेमेंट थांबवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.


याआधीही घडलीय अशी घटना


महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशात अशी विचित्र घटना पहिल्यांदाच घडलेली नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये महिला आपल्या प्रियकरासह पळून गेल्या आहेत. गेल्या वर्षीही चार विवाहित महिला PMAY योजनेंतर्गत 50,000 रुपये घेऊन त्यांच्या प्रियकरासह पळून गेल्या होत्या. PMAY योजनेचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरांचे बांधकाम सुरू झाले नसल्याचे समजले, तेव्हा ही घटना उघडकीस आली.


या अधिकाऱ्यांनी या कुटुंबांना नोटिसाही पाठवल्या होत्या, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पुढील तपासाचा एक भाग म्हणून, जिल्हा नागरी विकास संस्थेने चार महिलांच्या पतींना नोटीस पाठवून परिस्थिती जाणून घेतली होती. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं होतं.