मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसत आहेत, त्यांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले जात आहे. हे मृत्यू मेथिल अल्कोहोलच्या सेवनामुळे झाल्याचा संशय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

11 dead after consuming toxic liquor in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सागरमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 10 मृत्यूंची पुष्टी केली आहे. सुमारे 35 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती अजूनही गंभीर आहे. गंभीर रुग्णांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज आणि सागर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौरोजा आणि घुघरा खुर्द या गावांमध्ये केंद्रित आहे. बाधित गावांमध्ये तपासणी सुरू असून, दारू प्यायलेल्यांची चाचणी केली जात आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसत आहेत, त्यांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले जात आहे. हे मृत्यू मेथिल अल्कोहोलच्या सेवनामुळे झाल्याचा संशय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राथमिकदृष्ट्या मेथिल अल्कोहोलचे सेवन
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत करण्यात आलेल्या दोन-तीन शवविच्छेदनांमधून प्राथमिकदृष्ट्या मेथिल अल्कोहोलचे सेवन झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून दारूचा पुरवठा केला जात होता. काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. ललितपूरमधील नेटवर्कचाही तपास सुरू आहे. डॉक्टरांच्या मते, रुग्णालयात आणलेल्या रुग्णांचे मृतदेह निळे पडले होते आणि त्यांच्या शरीरात कडकपणा जाणवत होता. प्रशासनाने बीएमसीमध्ये संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवल्या आहेत. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत.
6 दारूची दुकाने सील आणि नमुने घेण्याचे निर्देश
मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. सागर आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बाधित गावांना भेट देऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सहा दारूची दुकाने सील करण्यात आली असून नमुने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध दारू व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल
दुबईला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, त्यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल. अशा घटनांबाबत आमच्या सरकारची भूमिका शून्य सहनशीलतेची असेल. उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी सांगितले की, या अपघाताला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी 'X' वर पोस्ट करून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उमंग सिंघार मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार
विरोधी पक्षनेते उमंग सिंघार आज सागर जिल्ह्यातील बांदा येथे भेट देणार आहेत. ते विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील. ते कुटुंबीयांकडून घटनेची माहितीही घेतील.
इतर महत्वाच्या बातम्या





















