Worlds Richest Families: जगभरातील श्रीमंत व्यक्ती किंवा कुटुंबांची चर्चा नेहमीच रंगल्याचं आपण पाहतो. त्यांची नावं नेहमीच चर्चेत असतात. अशातच भारतातील गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा समावेश जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये केला जातो. पण आज आपण यांच्याबद्दल बोलणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, जगात अफाट संपत्तीची मालकी असलेल्या कुटुंबांबाबत. जाणून घेऊयात, जगभरातील टॉप 10 श्रीमंत कुटुंबांबाबत... 


UAE चे House of Nahyan जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब 


ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी 2023 (World's Richest Families 2023) नुसार, हाऊस ऑफ Nahyan हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांचं कुटुंब प्रथमच या यादीत सामील झालं आहे. सध्या हे कुटुंब पहिल्या क्रमांकावर आलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 305 अब्ज डॉलर एवढी आहे. या यादीतून हे स्पष्ट होतं की, जगातील बहुतांश संपत्ती ही ऑईल उद्योगातून बनलेली आहे. नाहयान कुटुंबाच्या जमिनीवर UAE चा सर्वात मोठा तेलाचा साठा सापडला आहे. 


वॉल्टन आणि हर्मीस कुटुंबाचाही टॉप 3 मध्ये समावेश 


जगातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत कुटुंब अमेरिकेचं वॉल्टन कुटुंब (Walton Family) आहे. या कुटुंबानं वॉलमार्टमधून आपली संपत्ती कमावली आहे. या कुटुंबाकडे जगातील सर्वात मोठी रिटेल चेन वॉलमार्ट आहे. त्यांची संपत्ती 259.7 अब्ज डॉलर एवढी होती. तिसर्‍या क्रमांकावर फ्रान्सचं हर्मीस कुटुंब आहे, ज्यांची मालमत्ता 150.9 अब्ज डॉलर एवढी आहे. या कुटुंबाकडे लक्झरी फॅशन ब्रँड 'द हाऊस ऑफ हर्मीस' आहे.


कतारच्या राजघराण्यानंही पटकावलंय स्थान 


अमेरिकन कन्फेक्शनरी कंपनी मार्स चालवणारे मार्स कुटुंब 141.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे. कतारच्या राजघराण्यातील अल थानिसचं घर 135 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे. तेलाच्या साठ्यांव्यतिरिक्त, अल थानिझ कुटुंबाकडे फॅशन लेबल व्हॅलेंटिनो आणि परदेशात अनेक मालमत्ता देखील आहेत.


भारतातील अंबानी कुटुंबही टॉप 10 मध्ये 


अमेरिकन पेट्रोकेमिकल कंपनी कोच इंडस्ट्रीजचे मालक असलेल्या कोच कुटुंबानंही टॉप टेनमध्ये स्थान पटकावलं आहे. त्यांच्याकडे 127.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याशिवाय सौदी अरेबियाचं राजघराणं 'हाऊस ऑफ सऊद' आहे. त्यांच्याकडे 112 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. यानंतर, भारतातील अंबानी कुटुंब देखील 89.9 डॉलर अब्ज संपत्तीसह या यादीत सामील झालं आहे. फ्रेंच फॅशन हाऊस चॅनेलचे मालक वेर्थिमर्स कुटुंब 89.6 डॉलर अब्ज आणि रॉयटर्स न्यूजचे मालक थॉम्पसन कुटुंब 71.1 डॉलर अब्ज संपत्तीसह यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.


एका वर्षात 25 कुटुंबांच्या संपत्तीत 1.5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ 


ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गेल्या एका वर्षात जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अशा 25 कुटुंबांच्या संपत्तीत 1.5 डॉलर ट्रिलियनची वाढ झाली आहे. तसेच, या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या आखाती देशांतील तीन राजघराण्यांची संपत्ती अंदाजापेक्षा कितीतरी अधिक आहे. रशियातील आघाडीच्या खाण कंपनी नोरिल्स्क निकेलचे मालक व्लादिमीर पोटॅनिन यांचं कुटुंब 30 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत 49व्या क्रमांकावर आहे.