Charlie Munger Death : आज आंतरराष्ट्रीय बाजाराला मोठा झटका बसला आहे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) यांचे सर्वात विश्वासू सल्लागार चार्ली मंगर (Charles Thomas Munger) यांचं 99 व्या निधन निधन झालं आहे. चार्ली मंगर वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) चे वाइस चेयरमनही होते. बर्कशायर हॅथवे कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे. चार्ली मंगर यांनी कॅलिफोर्निया येथील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 1 जानेवारीला चार्ली त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करणार होते. पण, त्याआधीच त्यांच निधन झालं आहे. यानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे.


वॉरन बफेट यांचा उजवा हात चार्ली मंगर यांचं निधन


दिग्गज गुंतवणूकदार चार्ली मंगर यांचं मंगळवारी रात्री उशिरा निधन झालं आहे. प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट फर्म बर्कशायर हॅथवेचे व्हाईस चेअरमन चार्ली मंगर यांचं 28 नोव्हेंबर रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बर्कशायर हॅथवे कंपनीने निवेदन जारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीने म्हटले आहे की, "चार्ली मंगर यांनी कॅलिफोर्नियातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला." चार्ली मंगर हे बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरन बफेट यांचा उजवा हात मानले जायचे.


बर्कशायर हॅथवेच्या यशात चार्लीचा मोठा वाटा :  वॉरन बफे


चार्ली मंगर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना वॉरन बफेट यांनी म्हटलं आहे की, बर्कशायर हॅथवेच्या यशात चार्ली मंगर यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. वॉरन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ''चार्ली मंगर यांच्या सहभागाशिवाय आणि सल्ल्याशिवाय बर्कशायर हॅथवे एवढ्या उच्च पातळीवर पोहोचू शकलं नसतं. कंपनीला मोठं करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जी कायम स्मरणात राहील.''


एक महान उद्योगपती


चार्ली मंगर यांचा जन्म 1 जानेवारी 1924 रोजी झाला होता आणि येत्या नवीन वर्षात ते 100 वर्षांचे झाले असते. मंगर यांच्या निधनावर इंडस्ट्रीतील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी ट्विट केले की, ''चार्ली मंगर, एक महान उद्योगपती आणि त्याच्या सभोवतालच्या जगाचा निरीक्षक. त्यांनी आपल्या हुशारीने आणि समजुतदारपणाने अनेक पिढ्यांतील नेत्यांना प्रभावित केलं. त्याची खूप आठवण येईल. चार्ली यांच्या आत्म्याला शांती लाभो.''


चार्ली मंगर यांचा जीवनप्रवास


अमेरिकेत जन्मलेल्या चार्ली मंगर यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी शिक्षण घेतलं, त्यानंतर त्यांनी आर्थिक क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी 1962 मध्ये मुंगर, टोलेस अँड ओल्सन ही आर्थिक कायदा संस्था स्थापन केली. मंगर यांची बफेट यांच्यासोबत पहिली भेट 1959 मध्ये झाली होती. आर्थिक बाबींतील स्वारस्यामुळे दोघेही एकत्र काम करु लागले. 1978 मध्ये चार्ली मंगर यांनी बर्कशायर हॅथवे कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी एकामागोमाग एक यश मिळवलं. चार्ली मंगर आणि पत्नी नॅन्सी बॅरीयांनी 54 वर्षे सुखी संसार थाटला. 2010 मध्ये नॅन्सी बॅरी यांचं निधन झालं. चार्ली मंगर यांना त्याच्या पहिल्या पत्नीपासून तीन आणि दुसऱ्या पत्नीपासून चार मुले आहेत.


चार्ली मंगरची एकूण संपत्ती


चार्ली मंगर यांची 2023 मध्ये एकूण संपत्ती सुमारे $2.3 अब्ज आहे. भारतीय रुपयांमध्ये ही संपत्ती सुमारे 21,000 कोटी इतकी आहे. बर्कशायर हॅथवेचे वाईस-चेअरमन म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, ते एक प्रसिद्ध रिअल इस्टेट वकील, कॉस्टको बोर्ड सदस्य, डेली जर्नल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. दिग्गज गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.