5G Network: वाढते कर्ज आणि इतर संकटांत सापडलेल्या व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपनीने टेलकॉम क्षेत्रात खळबळ निर्माण करणारा निर्णय घेतला आहे. या कंपनीने नोकिया (Nokia), एरिक्सन (Ericsson) तसेच सॅमसंग (Samsung) यासारख्या दिग्गज कंपन्यांसोबत तब्बल 3.6 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. या कराराअंतर्गत नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंग या तीन कंपन्या व्होडाफोन आयडिया या टेलकॉम कंपनीला नेटवर्क इक्विपमेंट्सचा पुरवठा करणार आहेत. हा करार म्हणजे टेलकॉम क्षेत्रातील सर्वांत मोठी घडामोड म्हटले जाते आहे. या कराराच्या माध्यमातून 4जी आणि 5जी नेटवर्कचा विस्तार करणार आहे.
120 लोकांपर्यंत पोहोचण्याचा व्होडाफोन आयडियाचा प्लॅन
या करारानंतर व्होडाफोन आयडिया या कंपनीने आगामी वाटचालीबद्दल रविवारी भाष्य केलं. आम्ही लवकरात लवकर 4जी नेटवर्क 120 कोटी लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यासह 5जी नेटवर्कचाही विस्तार लवकरात लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नोकिया आणि एरिक्सन या दोन कंपन्या याआधीपासून आमच्यासोबत काम करत आहेत. आता आम्ही यापुढे सॅमसंगसोबतही काम करणार आहोत. आता झालेल्या या कराराच्या मदतीने आम्ही या कंपन्यांच्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून आमचे व्होडाफोन आयडिया नेटवर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम करणार आहोत, असे या कंपनीने सांगितले आहे. भविष्यातही आम्ही नेटवर्क टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक वाढवणार आहोत, असे व्होडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंदडा (Akshaya Moondra) यांनी सांगितले. आमच्या ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा हाच आमचा उद्देश आहे. सध्या टेलकॉम क्षेत्रात विस्तार करण्यास खूप वाव आहे. याच संधीचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे, असे अक्षय मुंदडा यांनी सांगितले.
24 हजार कोटी रुपयांचा निधी उभारला होता
या कराराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उपकरणांतून उर्जेची बचत होईल. तसेच आमच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्येही घट होईल. सर्वांत अगोदर आम्हाला आमच्या 4जी नेटवर्कचा विस्तार करायचा आहे, असे या कंपनीने सांगितले आहे. नुकतेच या कंपनीने 24 हजार कोटी रुपयांचा निधी उभारला होता. त्यासह व्होडाफोन आयडिया या कंपनीने 3,500 कोटी रुपये खर्च करून नव्या स्पेक्ट्रमची खरेदी केली होती. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आम्ही आमच्या क्षमतेत 15 टक्क्यांची वाढ करू. या माध्यमातून आम्ही 1.6 कोटी लोकांपर्यंत पोहोचू, असा विश्वासही या कंपनीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, एअरटेल आणि जिओ या टेलकॉम कंपन्या व्होडाफोन आयडिया या कंपनीच्या प्रतिस्पर्धी आहेत. आता व्होडाफोन आयडिया या कंपनीने 3.6 अब्ज डॉलर्सचा करार केल्यामुळे एअरटेल आणि जिओ या टेलकॉम कंपन्यांवर काय परिणाम होणार? असे विचारले जात आहे.
हेही वाचा :
सोमवारी 'हे' चार स्टॉक देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस किती?
हा आठवडा महत्त्वाचा, पैसे ठेवा तयार, एक-दोन नव्हे तर तब्बल 11 दमदार आयपीओ येणार!