Vande Bharat Train: रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. देशात आणखी दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat train) सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 12 मार्चला म्हणजे मंगळवारी याचे उद्घाटन होणार आहे. ही नवी वंदे भारत ट्रेन कर्नाटकची राजधानी बंगळुरु आणि चेन्नई दरम्यान चालवली जाणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नई आणि म्हैसूर दरम्यान बंगळुरुमार्गे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.


12 मार्चला पंतप्रधान मोदी (PM Modi) दाखवणार हिरवा झेंडा 


भारतीय रेल्वेने (Indian Railway) गेल्या काही वर्षांत देशभरातील अनेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. आता या यादीत आणखी एका राज्याचे नाव जोडले जाणार आहे, जिथे दुसरी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) सुरू होणार आहे. ही नवी वंदे भारत ट्रेन कर्नाटकची राजधानी बंगळुरु आणि चेन्नई या दोन शहरादरम्यान चालवली जाईल. मंगळवार, 12 मार्च, 2024 रोजी, पंतप्रधान मोदी आभासी माध्यमातून बंगळुरु आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या या नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याबाबतची माहिती खासदार पीसी मोहन यांनी बंगळुरुमध्ये दिली आहे. या ट्रेनच्या माध्यमातून सरकार बंगळुरु आणि चेन्नईसारख्या आयटी शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.


362 किलोमीटरचा प्रवास अवघ्या चार तास 20 मिनिटात


मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेन बंगळुरु ते चेन्नई दरम्यानचा 362 किलोमीटरचा प्रवास अवघ्या चार तास 20 मिनिटांत पूर्ण करेल. सध्या या मार्गावर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला प्रवास पूर्ण करण्यासाठी चार तास 40 मिनिटे लागत आहेत. टाईम्स ऑफ इंडियात दिलेल्या वृत्तानुसार, नवी वंदे भारत ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.


ट्रेनचे वेळापत्रक


नवीन वंदे भारत ट्रेन चेन्नई सेंट्रल येथून संध्याकाळी 5 वाजता सुटेल आणि बंगळुरुमध्ये रात्री 9.25 वाजता आणि म्हैसूरला रात्री 11.20 वाजता पोहोचेल. ही ट्रेन म्हैसूरहून सकाळी 6 वाजता सुटेल आणि बंगळुरुला सकाळी 7.45 वाजता पोहोचेल आणि त्यानंतर बेंगळुरुहून सकाळी 7.45 वाजता ट्रेन चेन्नईला 12.20 वाजता पोहोचेल. चेन्नई-बेंगळुरू-म्हैसूर मार्गावर धावणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. या ट्रेनच्या भाड्याबाबत रेल्वेने अद्याप अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.


महत्वाच्या बातम्या:


Budget 2024: देशात 400 नव्या वंदे भारत गाड्या सुरू होणार! अर्थसंकल्पात होणार पैशाची तरतूद