नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून देशातील विविध मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास अलिशान आणि आरामदायी असतो. आता देशातील तीन मार्गांवर नव्यानं वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली. नागपूर-पुणे, बंगळुरु- बेळगाव, अमृतसर ते श्री वैष्णोदेवी कटरा या तीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर रविवारी 10 ऑगस्टला जाणार आहेत. यावेळी ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. 

Continues below advertisement

नागपूर -पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (अजनी-हडरपसर)

नागपूरमधील अजनी रेल्वे स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टला पुण्यातील हडरपसर रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. या दोन्ही स्थानकांमधील अंतर 850 किमी अंतर आहे. वंदे भारत एक्स्प्रेस 12 तासात हे अंतर पार करेल.

सध्या महाराष्ट्र एक्सप्रेसला पुणे ते नागपूर अंतर पूर्ण करण्यासाठी 18 तासांहून अधिक तास लागतात. तर इतर मेल एक्सप्रेस 16 तासांपर्यंत वेळ घेतात. हावडा दुरांतो मात्र 13 तासात पुणे-नागपूर अंतर पार करते. 

Continues below advertisement

सध्या पुणे रेल्वे स्थानकावरुन नव्या एक्स्प्रेस सुरु होणं शक्य नाही. त्यामुळं ही वंदे भारत एक्स्प्रेस पुणे जंक्शन ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत धावेल. अजनी-हडपसर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड या स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन हायस्पीड, आरामदायी असल्यानं प्रवासाचा वेळ देखील कमी होत आहे. 

रविवार 10 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या तीन वंदे भारत एक्स्प्रेससंदर्भातील ट्रेनचे क्रमांक, वेळा आणि कोणत्या स्टेशनवर ट्रेन थांबतील यासंदर्भातील माहिती PRS प्रणालीवर दोन दिवस अगोदर दाखवण्यात येईल. 

दरम्यान,केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन या तीन वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना हिरवा झेंडा दाखवतील.