वॉशिंग्टन :  जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला सध्या वेगळ्याच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक बड्या अमेरिकन कंपन्यांमध्ये महिनाभरापासून कामगारांनी संप पुकारला आहे. आता या संपाचा परिणाम अमेरिकेबाहेरही दिसून येत असून जगातील अनेक कंपन्यांना या संपाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. 


'रॉयटर्स'च्या एका वृत्तात एका एनालिस्टने म्हटले की, अमेरिकन कंपन्यांमध्ये सुरू असलेला संप लवकर संपवला नाही तर जगभरातील विविध कंपन्यांवर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या संपामुळे आधीच प्रभावित आहेत.


आतापर्यंत 7 अब्ज डॉलरचे नुकसान 


अमेरिकेतील डेट्रॉईट शहर हे ऑटो हब म्हणून ओळखले जाते. तीन मोठ्या ऑटो कंपन्यांचे कामगार गेल्या महिनाभरापासून संपावर आहेत. ट्रेड युनियन युनायटेड ऑटो वर्कर्स अर्थात यूएडब्ल्यूने या संपाची हाक दिली आहे. हा संप 36 दिवसांपासून सुरू आहे. संपामुळे आतापर्यंत 7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


कंपन्यांनी व्यक्त केली भीती


अमेरिकन एअरलाइन डेल्टा एअरलाइन्स या कंपनीला संपाचा पहिला फटका बसला आहे. डेट्रॉईटमध्ये सुरू असलेल्या संपाचा त्यांच्या व्यवसायावर लक्षणीय परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. पेंट आणि कोटिंग कंपनी पीपीजी इंडस्ट्रीजने संपामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. रेल्वे कंपनी युनियन पॅसिफिकनेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे.


या कंपन्यांवर परिणाम 


जनरल मोटर्स, फोर्ड मोटर आणि स्टेलांटिस या ऑटो कंपन्यांना या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तिन्ही कंपन्यांना सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांचे कामगार मोठ्या संख्येने संपात आहेत. त्यांच्याशिवाय ट्रकिंग कंपन्यांनाही अडचणी येत आहेत. या कंपन्यांचे ३४ हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आता या संपामुळे जगातील इतर ऑटोमोबाईल आणि एव्हिएशन कंपन्यांच्या कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.