नवी दिल्ली : केंद्र सरकार सर्व नागरिकांसाठी 'यूनिवर्सल पेन्शन योजना' आणणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं यावर काम सुरु केलं आहे. ही योजना ऐच्छिक असेल, अशी माहिती आहेत. या योजनेत सदस्यांना स्वत: देखील आर्थिक योगदान द्यावं लागेल, त्यानंतर त्यांना पेन्शन मिळेल. सरकार या योजनेची अंमलबजावणी ईपीएफओ तर्फे लाँच करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पायाभूत सुविधांसंदर्भात काम सुरु असल्याची माहिती आहे. या संदर्भातील काम पूर्ण झाल्यास श्रम आणि रोजगार मंत्रालय इतर मंत्रालयांसोबत चर्चा करेल. यासंदर्भातील वृत्त 'नवभारत टाइम्स' या हिंदी दैनिकानं दिलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या योजनेत जुन्या योजनांचा देखील समावेश केला जाईल. या योजनेत अधिक लोकांना सदस्य करुन घेतलं जाऊ शकतं. असंघटित क्षेत्रातील मजूर, व्यापारी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ मिळेल.18 वर्ष पूर्ण झालेला किंवा त्यापेक्षा अधिक वअसणारा व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळेल.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या योजनेत घेतलं जाईल. या दोन्ही योजना ऐच्छिक आहेत. दोन्ही योजनांमध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मिळतात. यामध्ये दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. अटल पेन्शन योजनेला देखील यामध्ये घेतलं जाऊ शकतं. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देखील त्यांच्या पेन्शन योजनांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी सांगू शकते. यामुळं सरकारी योगदान सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात वाटलं जाईल. पेन्शन रक्कम वाढण्यात याचा फायदा होईल.
अटल पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळते?
अटल पेन्शन योजनेचं खातं बँक किंवा पोस्टामध्ये उघडता येतं. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 18 ते 40 वयाच्या दरम्यान असावं लागतं. जेव्हा तुम्ही खातं उघडता त्यावेळी तुम्हाला नॉमिनीची माहिती द्यावी लागते. समजा एखादा व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेचा सदस्य होत असेल तर त्याला 1456 रुपये दरमहा भरावे लागतील. तर, याशिवाय एका व्यक्तीचं वय 18 वर्ष असेल तर त्याला दरमहा 210 रुपये भरावे लागतील. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 5000 रुपयांपर्यंत रक्कम पेन्शन मिळते.
दरम्यान, जे लोक आयकर भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
इतर बातम्या :