Union Budget 2025 Expectations : आगामी अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त सहा दिवस उरले आहेत. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेने मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. विशेषत: सर्वसामान्यांच्या हातात रोख रक्कम देणाऱ्या ज्या सरकार अनुदानित योजना आहेत, त्यामध्ये वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळं पीएम आवास योजना ते पीएम किसान सन्मान निधी या योजनांच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या योजनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, याबाबतची माहिती पाहुयात.
पीएम आवास योजना
सरकार प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदानाची रक्कम वाढवू शकते. याशिवाय तसेच बँकांकडून कर्ज घेण्याची प्रक्रियाही सुलभ केली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन विशेषत: शहरी घरांसाठी अधिक वाटप जाहीर करू शकतात.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अर्थसंकल्पात अधिक तरतूदही केली जाऊ शकते. यामुळे या योजनेत अधिकाधिक नवीन कुटुंबांचा समावेश करण्याच्या मोहिमेला बळ मिळेल. अलीकडेच या योजनेत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना जोडण्याची घोषणा करण्यात आली. आता या योजनेतील वाटप वाढल्याने योजनेची व्याप्ती वाढवणे सोपे होणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना
पीएम किसान सन्मान निधी 6 हजार रुपयावरुन 12 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा प्रभाव कमी होऊ शकतो. अनेक दिवसांपासून शेतकरी निधीत वाढ करण्याची मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज आणि कमी कराचाही विचार करू शकते.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
सरकार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या बजेटमध्ये 10 टक्के वाढही करू शकते. गेल्या वर्षी यासाठी 14,800 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. यंदा ती वाढवून 16,100 कोटी करण्याची शक्यता आहे. सरकार एमएसएमई क्षेत्रासाठी अधिक क्रेडिट गॅरंटी आणि कमी व्याजावर कर्ज देण्याची घोषणा देखील करू शकते.