Twitter Subscription Hike For iPhone Users : ट्विटर (Twitter) आयफोन युजर्सना (iPhone Users) झटका देण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटर आयफोन (iPhone) युजर्ससाठी अधिक शुल्क आकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्विटरवरील ब्लू सबस्क्रिप्शनची (Twitter Blue Tick Subscription) किंमत 600 रुपये आहे. ही किंमत आयफोन युजर्ससाठी 900 रुपयांपर्यत वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयफोनवर ट्विटर ॲपच्या ब्लू सबस्क्रिप्शनसाठी अधिक शुल्क आकारण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयफोन युजर्सच्या खिशाला कात्री बसणार आहे. 


आयफोन युजर्ससाठी अधिक शुल्क?


वेबसाईट आणि अँड्रॉईड युजर्ससाठी ब्लू सबस्क्रिप्शनचं शुल्क तेवढंच असणार आहे, पण आयफोन ग्राहकांसाठी ट्विटर अधिक शुल्क आकारण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या वेबसाईटवरील युजर्सच्या संख्येत घट झाली आहे. ट्विटरच्या वेबसाईटवरील युजर्सची संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. आयफोन युजर्ससाठी अधिक शुल्क आकारण्यात आल्यावर ट्विटरचे युजर्स वेबसाईटकडे खेचले जातील, असं ट्विटरच मत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ट्विटर आयफोन युजर्ससाठी ब्लू सबस्क्रिप्शनचं शुल्क वाढवण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे.


दरम्यान ब्लू सबस्क्रिप्शन आणि आयफोन युजर्सच्या बाबतीत ट्विटर कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क ट्विटरवरील व्हेरिफाईड सबस्क्रिप्शनसाठी वेगवेगळ्या पर्याय आणणार असल्याचंही समोर आलं आहे. येत्या काळात याबाबतचं चित्र समोर येईल. 


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. ट्विटरवरील बनावट खात्यांना आळा घालण्यासाठी मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात आलं आहे. संभाव्य जागतिक मंदीचं सावट पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.