मुंबई : भारतीय शेअर बाजारात एकीकडे घसरणीचा ट्रेंड कायम असला तरी टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीचा स्टॉक रॉकेट बनला आहे.टायटन कंपनीच्या स्टॉकमध्ये आज 4.63 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. आज (7 जानेवारी 2026) ला टायटनच्या शेअरनं 4312.10 रुपयांचा उच्चांक गाठला.  या शेअरमधील तेजीमुळं गुंतवणूकदार आणि अब्जाधीश रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती एका दिवसात 800 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

Titan च्या शेअरमध्ये तेजी

टायटन कंपनीचा शेअर काल 4112 रुपयांवर बंद झाला होता. आज बाजार सुरुवात झाली तेव्हा टायटनचा शेअर 4225 रुपयांवर ओपन झाला. त्यानंतर टायटनच्या शेअरं 4312.10 रुपयांचा उच्चांक गाठला. दिवसभरातील उच्चांक गाठल्यानंतर या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. दुपारी अडीच वाजता 163.80 रुपयांच्या तेजीसह 4275 रुपयांवर ट्रेड करत होता. टायटन कंपनीच्या स्टॉकचा हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

टायटन कंपनीकडून दागिने आणि घड्याळांची निर्मिती केली जाते. टायटन कंपनीकडून डिसेंबर तिमाहीत उत्पन्नात 40 टक्क्यांहून जास्त तेजीची माहिती दिली आहे. मंगळवारी टायटनकडून तिमाहीत दागिने विभागात डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर 41 टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगितलं. टायटन कंपनीमध्ये 85 टक्के व्यवसाय टायटन ज्वेलरीचा आहे. 

टायटन कंपनीत रेखा झुनझुनवाला यांची मोठी भागीदारी आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत  रेखा झुनझुनवाला यांची भागीदारी  5.32 टक्के होती. त्यानुसार त्यांच्याकडे टायटनचे  47,293,470 शेअर होते. त्यानुसार त्यांची 6 जानेवारीला  टायटनमधील गुंतवणूक 19416 कोटी रुपयांची होती. आज त्याचं मूल्य 800 कोटी रुपयांनी वाढून 20212 कोटी रुपये झालं आहे.     

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड कायम आहे. नववर्षात पहिल्या दोन दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली होती. त्यानंतर 5 जानेवारीपासून भारतीय शेअर बाजारात घसरण कायम आहे.  सेन्सेक्स आणि निफ्टीत दुपारी 3 वाजता सेन्सेक्समध्ये  214.31 अंकांची घसरण झाली तर, निफ्टीत 61.05 अंकांची घसरण झाली आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)