TCS News : आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादासयक बातमी समोर आली आहे. TCS मध्ये कोणत्याही प्रकारची नोकरकपात होणार नसल्याची माहिती कंपनीचे सीईओ के कृतिवासन (TCS CEO Krithivasan) यांनी दिली आहे.  उलट आम्हाला अधिक लोकांची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळं येत्या काळात TCS मध्ये आणखी नोकरभरती होण्याची शक्यता आहे. 


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने नोकरकपातीच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीचे सीईओ के कृतिवासन यांनी सांगितले की, कंपनीला आणखी लोकांची गरज भासणार आहे. त्यामुळं आयटी कंपनी यावर्षीही अनेक नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गजांच्या या भूमिकेमुळे नोकऱ्यांवरील जागतिक मंदीच्या भीतीचे ढग दूर होताना दिसत आहेत.


 अर्थव्यवस्था तेजीत असल्यानं नोकरीच्या संधी वाढणार


सीईओ कृतिवासन यांनी नॅसकॉमच्या एका कार्यक्रमात सांगितले की, कंपनी नोकरभरती कमी करण्याचा विचार करत नाही. जास्तीत जास्त लोकांना आमच्याशी जोडण्याची आमची योजना आहे. आयटी क्षेत्रात मागणी वाढण्याची प्रत्येक अपेक्षा असल्यानं अर्थव्यवस्था तेजीत आहे. यामध्येही आयटी क्षेत्रासाठी आशेचा किरण दिसतो. काम वाढले तर लोकांची गरजही वाढणार असल्याचे कृतिवासन म्हणाले. अशा स्थितीत नोकऱ्या कमी करण्याऐवजी अधिकाधिक नवीन नोकऱ्या देण्यास कंपनी तयार आहे. यापूर्वीही आम्ही अनेक नोकऱ्या देत आलो आहोत. 


जगभरात कंपनीत 6 लाखांहून अधिक कर्मचारी कामावर


TCS ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. महसूल, नफा आणि कार्यशक्तीच्या बाबतीतही ते पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरातील कंपनीत 6 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, काही कंपन्यांनी यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही टीसीएसचे सीईओ कृतिवासन यांनी दिली. 


आयटी उद्योगात 60 हजार नवीन नोकऱ्या निर्माण होणार


सॉफ्टवेअर उद्योग संघटना NASSCOM ने अलीकडेच सांगितले होते की, 2023-24 या आर्थिक वर्षात IT क्षेत्रात सुमारे 60 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. हा आकडा 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे. सध्या सुमारे 5.43 लाख लोक आयटी उद्योगात काम करत आहेत. टीसीएसमध्ये 2 लाखांहून अधिक महिला कर्मचारी आहेत. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 35.7 टक्के असल्याची माहिती कृतिवासन यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या:


कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये यावच लागेल, TCS चा मोठा निर्णय; TCS मध्ये नोकरकपात होणार का?