Continues below advertisement

मुंबई : टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 1.4 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील नफा 12075 कोटी रुपयांनी वाढला. हा बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी मानला जातोय. तर, कंपनीचं उत्पन्न 65114 कोटी इतकं आहे. टीसीएसनं दुसरा अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे. याशिवाय कंपनी एआय क्षेत्रात देखील पाऊल टाकणार आहे.

tcs q2 results 2025 : टीसीएसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न 65799 कोटी राहीलं आहे. हे गेल्या तिमाहीच्या तुलनेत 3.7 टक्के अधिक आहे. ऑपरेटिंग मार्जिन 25.2 टक्क्यांवर पोहोचलं आहे. यामध्ये 70 बेसिस पॉईंटची वाढ झाली. तर, नेट मार्जिनमध्ये 19.6 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. कंपनीचं निव्वळ उत्पन्न 12904 कोटी रुपये आहे. ऑपरेशन्सकडून येणारा कॅश फ्लो नेट इन्कम 110 टक्के राहिला आहे.

Continues below advertisement

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं प्रतिशेअर 11 रुपये लाभांश जाहीर केला आहे. याची रेकॉर्ड डेट 15 ऑक्टोबर 2025 आहे. गुंतवणूकदारांना या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल तर 15 ऑक्टोबरपूर्वी टीसीएसचे शेअर खरेदी करावे लागतील. लाभांश रक्कम शेअर धारकांच्या खात्यात 4 नोव्हेंबरपर्यंत जमा केली जाईल. टीसीएसचा शेअर दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी 3060.20 रुपयांवर होते.

एआय वापरावर लक्ष केंद्रीत करणार

टीसीएसनं म्हटलं की जगातील सर्वात मोठी एआय संचलित तंत्रज्ञान कंपनी होण्याच्या दिशेनं काम सुरु आहे. यासाठी कंपनीनं काही धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ज्यामध्ये भारतात 1 GW क्षमतेचं एआय डेटा सेंटर तयार करण्यासाठी नवी कंपनी आणि Salesforce केंद्रीत कंपनी ListEngage चं अधिग्रहण करेल.

टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक के. किर्थीवासन यांनी म्हटलं की आम्ही जगातील सर्वात मोठी एआय संचलित तंत्रज्ञान कंपनी होण्याच्या मार्गावर आहोत. एआय तंत्रज्ञान स्वीकृतीतून टीसीएसची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते.

दरम्यान, टीसीएसनं कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी हॅकथॉन देखील आयोजित केली होती. त्यामध्ये पावणे तीन लाख कर्मचारी  सहभागी झाले होते. आज टीसीएसचे निकाल जाहीर झाल्यानंतर उद्या शेअर बाजारात कसा परिणाम दिसून येतो ते पाहावं लागेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)