TCS Bribe For Recruitment Scam : देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सलटंसी सर्विसेज (Tata Consultancy Services) ने नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. टीसीएस (TCS) कंपनीने 6 कर्मचारी आणि 6 बिझनेस असोसिएट फर्मवर बंदी घातली आहे. अलिकडेच टीसीएसमध्ये 100 कोटी रुपयांचा नोकरी घोटाळा समोर आला होता. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, बिझनेस असोसिएट पुरवठा व्यवस्थापन (Business Associate Supply Management) प्रक्रियेतील कमतरता शोधून काढेल.


6 कर्मचाऱ्यांना हटवलं, 6 बिझनेस असोसिएट फर्मवर बंदी 


देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने भरती घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे. टीसीएसने सहा कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, याशिवाय सहा व्यावसायिक सहयोगी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन याबाबत माहिती दिली आहे. लाच घेऊन नोकर भरती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


आणखी तीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू


वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शेयरहोल्डर्सच्या प्रश्नांना उत्तरं देताना कंपनीने पहिल्यांदाच या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या आठवडाभरापासून या प्रकरणाबाबत चर्चा सुरु होती. शेयरहोल्डर्सशी बोलताना टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, आम्हाला सहा कर्मचारी आढळले ज्यांचं वर्तन नैतिकतेच्या विरुद्ध होतं. याचा त्यांना काय फायदा झाला हे सांगता येणार नाही, पण ते काही कंपन्यांसाठी काम करत होते. त्या सर्व सहा कर्मचारी आणि त्यांच्यासंबंधित सहा व्यावसायिक सहयोगी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आणखी तीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.


टीसीएस नोकर भरती घोटाळा


टीसीएसमध्ये लाच घेऊन नोकऱ्या देण्याचा 100 कोटींचा घोटाळा नुकताच उघडकीस आला होता. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या 28 व्या सभेला संबोधित करताना टाटा सन्स (Tata Sons) चे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले, 'TCS त्याच्या पुरवठादार व्यवस्थापन प्रक्रियेचे पुनरावलोकन करेल आणि नियम अधिक कडक करेल. यामुळे कंपनीत नुकत्याच झालेल्या नोकरीतील घोटाळ्यासारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री करता येईल.'  कर्मचाऱ्यांमध्ये नैतिक आचरणाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.


100 कोटी रुपयांचा घोटाळा


टीसीएसमध्ये (TCS) नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे. एका व्हिसलब्लोअरने कंपनीच्या सीईओ आणि सीओओला पत्र लिहून आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती उमेदवारांना नियुक्ती देताना स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत आहेत, असा दावा केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली गेली. चौकशीनंतर टीसीएसने आता कारवाई केली आहे. गेल्या 3 वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.