Insurance Rate Hike: जर तुम्ही कार, स्कूटर किंवा नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे बजेट थोडे वाढवा. याचे कारण म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ.
1 जूनपासून प्रीमियमचे नवीन दर लागू होतील
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आपल्या ताज्या अधिसूचनेत विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे. मंत्रालयाने विमा नियामक IRDAI शी सल्लामसलत करून थर्ड पार्टी इन्शुरन्सचे प्रीमियम दर वाढवण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रीमियमचे हे वाढलेले दर 1 जूनपासून लागू होतील.
बाईक-स्कूटरसाठी इतका प्रीमियम आकारला जाईल
सरकारने आता 150cc पेक्षा जास्त आणि 350cc पेक्षा कमी बाईक, स्कूटरसाठी विमा प्रीमियम 1,366 रुपये केला आहे. तर 350cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या टू-व्हीलरसाठी विमा प्रीमियम आता 2,804 रुपये असेल. दुसरीकडे, जर तुम्ही 5 वर्षांसाठी सिंगल प्रीमियमवर थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणार असाल, तर 75cc पर्यंतच्या बाईक-स्कूटरसाठी 2,901 रुपये, 75 ते 150cc साठी 3,851 रुपये, 150 ते 350cc साठी 7,365 रुपये विमा प्रीमियम आहे.
गाड्या महागल्या, इतका वाढ प्रीमियम
जूनपासून कारचा थर्ड पार्टी इन्शुरन्सही महाग होणार आहे. अधिसूचनेनुसार, 1000cc पर्यंतच्या इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम 2,094 रुपये असेल. कोविडपूर्वी 2019-20 मध्ये ते 2,072 रुपये होते. तसेच 1000cc ते 1500cc कारसाठी विमा प्रीमियम 3,416 रुपये असेल, जो पूर्वी 3,221 रुपये होता. याशिवाय जर तुमच्या कारचे इंजिन 1500cc पेक्षा जास्त असेल, तर आता विमा प्रीमियम 7,890 रुपयांवर येईल. पूर्वी हे 7,897 रुपये होते. सरकारने 3 वर्षांसाठी सिंगल प्रीमियममध्येही वाढ केली आहे. आता 1000cc पर्यंतच्या कारसाठी 6,521 रुपये, 1500cc पर्यंतच्या कारसाठी 10,540 रुपये आणि 1500cc वरील कारसाठी 24,596 रुपये मोजावे लागतील.
इलेक्ट्रिक, हायब्रीड वाहने स्वस्त होतील
सरकार इलेक्ट्रिक आणि इंधन बचत करणाऱ्या वाहनांना भरपूर प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विम्याच्या प्रीमियमवर 15% आणि हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रीमियमवर 7.5% सूट असेल. याशिवाय स्कूल बस आणि विंटेज कारच्या विमा प्रीमियमवर अनुक्रमे 15% आणि 50% सवलत देखील उपलब्ध असेल.