वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
जागतिक स्तरावर साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर असताना, देशांतर्गत बाजारातही किंमती 19 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

Sugar Rate News : सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहतांच्या खिशाला झळ बसत आहे. साखरेच्या किंमती कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही साखरेच्या किमती वाढत आहेत. जागतिक स्तरावर साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर असताना, देशांतर्गत बाजारातही किंमती 19 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडण्याची शक्यता आहे.
साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखरेच्या किमतीतील ही वाढ कमी उत्पादनामुळे झाली आहे. अनेक भारतीय साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात साखरेच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. अनेक साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 9 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
साखरेच्या दरात एवढी वाढ का होतेय?
साखरेच्या किमतीतील ही वाढ घटलेल्या उत्पादनामुळे झाली आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. या राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन यावर्षी अंदाजे 28 ते 29 दशलक्ष टनांपर्यंत घटले आहे. हे उत्पादन देशाच्या वापराएवढे आहे.
साखरेच्या गैरवापरावर बंदी येऊ शकते
साखरेचा अतिरिक्त वापर रोखण्यासाठी, इथेनॉल उत्पादनासाठी साखरेच्या गैरवापरावर बंदी घालण्याची सरकार योजना आखत आहे. यामुळे साखरेचा वापर काही प्रमाणात कमी होऊ शकतो आणि वाढत्या किमतींना आळा बसू शकतो. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करताना दिसत आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं साठा मर्यादा देखील निश्चित केली आहे. दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाआ करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
ऊसाच्या उत्पादनावरही परिणाम होणार
भारतात साधारणपणे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात साखरेची मागणी वाढते. गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीसारखे प्रमुख सण या कालावधीत येतात. त्यामुळे मिठाई, बिस्किटे आणि इतर कन्फेक्शनरी उत्पादनांची मागणी वाढते. दरम्यान, मागणीत वाढ झाली की दरात देखील वाढ होते. यावर्षी ऊसाच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. कारण कमी पाऊस काळामुळं ऊसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं साखरेच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















