मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टी 50  निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 573 अंकांनी घसरुन 81118.60 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी 50 मध्ये 170 अंकांची घसरण होऊन तो 24718.60 वर बंद झाला. दोन्ही निर्देशांक सुरुवातीला  1.7 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, बाजाराचं सत्र संपेपर्यंत त्यामध्ये सुधारणा झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात देखील घसरण झाली.  एका दिवसात बाजारमूल्य 2.4 लाख कोटी रुपयांनी घसरुन 447.2 लाख कोटी रुपये झालं आहे.  

Continues below advertisement

पाच कारणांमुळं शेअर बाजार गडगडला

1. इस्त्रायल इराण संघर्षआज शेअर बाजारात घसरण झाली त्याचं सर्वात मोठं कारण इस्त्रायलनं इराणवर केलेला हल्ला मानला जात आहे. इस्त्रायलच्या हवाई दलानं इराणमधील अणवस्त्र केंद्र, मिसाईल कारखाने आणि इतर ठिकाणांवर हल्ले केले.  इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणच्या अणवस्त्र केंद्राच्या मुख्य केंद्रावर वार केल्याचं सांगितलं. ही कारवाई आणखी काही दिवस सुरु राहू शकते, असं त्यांनी म्हटलं. या संघर्षामुळं जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.  

2. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

Continues below advertisement

इराणवर हल्ले झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. डब्ल्यूटीआय आणि ब्रेंट क्रूडच्या दरात 10 टक्के वाढ झाली. भारत जगातील मोठा तेल आयातदार देश आहे, यामुळं भारताला मोठा फटका बसू शकतो.  

3. सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य

विविध देशांमधील तणावामुळं गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवण्याचा विचार केला. सोने, अमेरिकन डॉलर्स आणि बाँडसची मागणी वाढली. भारतात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांची वाढ झाली. अमेरिकेच्या डॉलर आणि बाँडमध्ये मजबुती आली.  जेव्हा गुंतवणूकदार जोखीम टाळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शेअर बाजारात घसरण होते.  

4. रुपयात घसरण

भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आज अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 86.25 वर खुला झाला. त्यामध्ये 73 पैशांची घसरण झाली. ही 8 मे नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. रुपया कमजोर झाल्यास आयात महागते.  .

5. अमेरिका-चीन व्यापार करारावर प्रश्नचिन्ह 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाला आहे. मात्र, मार्केटला अधिक अपेक्षा होता, कराराच्या अटींबाबत स्पष्टता आलेली नाही. या अस्पष्टतेमुळं बाजाराचं सेंटीमेंट कमजोर झालं आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)