मुंबई :  भारतीय शेअर बाजाराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने (NSE Nifty) पहिल्यांदाच 20 हजार अंकांचा टप्पा गाठला. निफ्टीने 19,000 ते 20,000 अंकांचा टप्पा हा 52 ट्रेडिंग सेशनमध्ये अर्थात व्यवहाराच्या 52 दिवसांत गाठला. बँकिंग स्टॉक्स (Nifty Banking) आणि अदानी समूहातील (Adani Group Shares) शेअर्समध्ये दिसून आलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजीचा जोर दिसून आला. तर, दुसरीकडे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 67 हजार अंकांचा टप्पा गाठला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 550 अंकांच्या तेजीसह 67,156 अंकावर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 176.40 अंकाच्या तेजीसह 19,996.35 अंकांवर बंद झाला. त्याआधी त्याने 20 हजार अंकांच्या टप्पा ओलांडला. 

कोणत्या सेक्टरमध्ये खरेदीचा जोर?

बँकिंग स्टॉक्समध्ये आज खरेदीचा जोर दिसून आला. बँक निफ्टीमध्ये 414 अंकांच्या तेजीसह 45,570  अंकांवर स्थिरावला. तर, आयटी, ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, मेटल्स, फार्मा, हेल्थकेअर सारख्या सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. मिड कॅप स्टॉक्समध्येही तेजी दिसली. मिड कॅप निर्देशांक 466 अंकांनी वधारत 41,444 अंकांवर बंद झाला. स्मॉल कॅप इंडेक्स हा 170 अंकांच्या तेजीसह 12,982 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 45 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे शेअर वधारले.

इंडेक्‍स किती अंकावर स्थिरावलादिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex67,127.0867,172.1366,735.8400:11:23
BSE SmallCap38,533.4038,603.1838,396.470.70%
India VIX11.3511.5010.345.26%
NIFTY Midcap 10041,444.2041,467.2041,148.701.14%
NIFTY Smallcap 10012,982.2513,006.3512,929.451.33%
NIfty smallcap 505,995.406,020.805,968.501.38%
Nifty 10019,970.8019,981.0019,841.750.92%
Nifty 20010,725.4010,730.4510,656.850.95%
Nifty 5019,996.3520,008.1519,865.350.89%

गुंतवणूकदारांचे चांगभलं

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात मोठी वाढ झाली. आज 11 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल हे  324.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी 320.94 लाख कोटी रुपये होते. आजच्या तेजीमुळे मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 3.31 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.  

2107 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3942 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2107 शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, 1665 कंपन्यांच्या शेअर्स दरात घसरण दिसून आली. तर 170 शेअर्स कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 370 कंपन्यांच्या शेअर्सने त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 17 कंपन्यांच्या शेअर्स दराने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. आजच्या व्यवहारात, 10 कंपन्यांच्या शेअर दराला अप्पर सर्किट लागले. तर, दोन कंपन्यांच्या शेअर दरांना लोअर सर्किट लागले.