Stock Market Today: ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा (Asia's Market Crash) परिणाम सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आणि तो उघडताच सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले  आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेने जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. आज देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. आजचा आठवड्याचा पहिलाच दिवस बाजारासाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे.

जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) अमेरिकेत वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित

सोमवारी प्री-ओपनिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेनेक्स 3600 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1400 अंकांनी खाली आला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आता भांडवली बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सावरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर टाटा मोटर्सचे समभाग 9 टक्क्यांनी गडगडले आहेत. जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ने एप्रिलसाठी अमेरिकेत वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली. अशातच, टाटा मोटर्सची उपकंपनी असल्याने समभागात घसरण झाल्याचं दिसून येत आहे. ट्रम्प यांच्याकडून आयात शुल्क लादल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. 

रिलायन्स ते टाटा समभाग कोसळले 

बीएसईचा लार्जकॅप निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात पूर्णपणे लाल दिसत होता. सर्व 30 मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खराब व्यवहारात होते. दरम्यान, टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आणि तो 10.43 टक्क्यांनी घसरून 125.80 रुपयांवर आला आहे. याशिवाय टाटा मोटर्स शेअर (8.29%), इन्फोसिस शेअर (7.01%), टेक महिंद्रा शेअर (6.85%), एलटी शेअर (6.19%), एचसीएल टेक शेअर (5.95%), अदानी पोर्ट्स शेअर (5.54%), टीसीएस शेअर (4.99%), रिलायन्स शेअर (4.55%) आणि 4.04 एनटीपीसी शेअर (4.55%) घसरले आहेत. याशिवाय मारुती शेअर, कोटक बँक शेअर, ॲक्सिस बँक शेअर, इंडसइंड बँक शेअर, टायटन शेअर, एसबीआय शेअर, बजाज फायनान्स शेअर, एचडीएफसी बँक शेअर, आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये 2-3 टक्क्यांची घसरण दिसून आली.

टाटा मोटर्सचे समभाग देखील कोसळले आहेत. टाटा मोटर्सची Jaguar कंपनी आहे, या कंपनीच्या गाड्यांचे उत्पादन अमेरीकेमध्ये होते. त्यांच्या गाड्या आयात होतात. यासंदर्भात कर लादल्यानंतर यासंदर्भात अमेरिकेत वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान टाटा मोटर्सच्या समभांगावर याचे परिसणाम झाल्याचे दिसून येत आहे.