State Bank of India मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या खातेदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं एटीएम व्यवहार शुल्कात बदल केला आहे. बँकेनं मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर एटीएम कार्ड वापराचं शुल्क वाढवलं आहे.  जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल आणि दुसऱ्या बँकेच्या एटीएम केंद्रातून मासिक मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर पैसे काढत असाल तर प्रत्येक व्यवहारावर  23 रुपये शुल्क द्यावं लागेल. शिल्लक रक्कम तपासणीसाठी 11 रुपये शुल्क द्यावं लागेल.  

Continues below advertisement

बँकांमध्ये लांब रांगांपासून वाचण्यासाठी बहुतांश लोक एटीएममधून पैसे काढतात. आता स्टेट बँक ऑफ इंडियानं घेतलेला नवा निर्णय खातेदारांसाठी अडचणीचा ठरु शकतो. बँकेनं याशिवाय ऑटोमेटिक डिपॉजिट कम विड्रॉल मशीनच्या वापराची फी देखील वाढवली आहे.  

कोणत्या खात्यांवर परिणाम होणार?

मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर एटीएमधून पैसे काढण्यासाठी पहिल्यांदा 21 रुपये शुल्क द्यावं लागत होतं. आता ते 23 रुपये झालं आहे. बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणीसाठी 11 रुपये द्यावे लागतील. नव्या निर्णयाचा परिणाम बेसिक सेविंग्ज बँक डिपॉजिट अकाऊंट, एसबीआय एटीएम वापर करणारे एसबीआय डेबिट कार्ड  होल्डर्स आणि किसान क्रेडिट कार्ड खात्यांवर होणार नाही.  

Continues below advertisement

एसबीआयनं शुल्कवाढीचा निर्णय का घेतला?

एसबीआयनं अलीकडच्या काळात इंटरचेंज फीमध्ये झालेल्या वाढीमुळं एटीएम व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पहिल्याप्रमाणं दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर दरमहा 5 मोफत व्यवहार करता येतील म्हणजे पैसे काढता येतील. पाच व्यवहार झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी 23 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. याशिवाय मिनी स्टेटमेंट  किंवा बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी 11 रुपये द्यावे लागतील. जे लोक एटीएमचा अधिक वापर करतात त्यांना यामुळं अधिक पैसे मोजावे लागू शकतात.