SBI Share Price मुंबई : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये आज 13.40 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. एनएसईवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 1018.90  रुपयांवर तर बीएसईवर 1018.75 रुपयांवर बंद झाला. मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग वॉल्यूम असल्यानं शेअरमध्ये तेजी दिसून आली. 

भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स  376.28 अंकांच्या घसरणीसह  85063.34 वर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 71.60 अंकांच्या घसरणीसह 26178.70 अंकांवर बंद झाला. स्टेट बँकेचा शेअर सलग सहा ट्रेडिंग सत्रात मजबूत दिसून येत आहे. या दरम्यान स्टॉक  6 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यात स्टेट बँकेच्या शेअरनं दमदार कामगिरी केली आहे. या काळात स्टेट बँकेचा शेअर  27 टक्क्यांनी वाढला आहे. 

SBI : एसबीआयचं बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर मध्ये आलेल्या तेजीमुळं बँकेचं बाजारमूल्य  9.45  लाख कोटींवर पोहोचलं आहे. बँकेच्या शेअरमध्ये येत्या काही दिवसात तेजी कायम राहिल्यास 10 लाख कोटींचा टप्पा देखील पार होऊ शकतो.  बँकिंग स्टॉकमध्ये बाजारमूल्याचा विचार केला तर सर्वाधिक बाजारमूल्य एचडीएफसी बँकेचं आहे. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य  14.87 ट्रिलियन डॉलर्स इतकं आहे. त्यानंतर आयसीआयसीआयस बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेचं बाजारमूल्य 10.07 लाख कोटी आहे. या दोन खासगी बँकांनंतर तिसरा क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाचा लागतो. 

ब्रोकरेज फर्म मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनंएसबीआय बँकिंग सेक्टरमधील पसंतीचा BUY Stock असल्याचं म्हटलं. एसबीआयचा स्टॉक येत्या काळात  1100 रुपयांचा टप्पा पार करु शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. बँकेची कमाई  आणि व्यवसाय मजबूत होत आहे. तर, क्रेडिट कॉस्ट नियंत्रणात आहे. बँकेनं आर्थिक वर्ष  2025-26 मध्ये कर्जाची वाढ 13 ते 14 टक्के अपेक्षित धरली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं डिसेंबर 2025 मध्ये रेपो रेट  0.25 टक्क्यांनी कमी केला असला तरी त्याचा परिणाम स्टेट बँकेवर झालेला नाही. याचं कारण सरकार आणि आरबीआयनं सीआरआरमध्ये कपात केली आहे. ज्यामुळं बँकांना दिलासा मिळणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं एसबीआयचा शेअर 1120 वर जाईल असा अंदाज वर्तवला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)