SIP Investment Tips : गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय म्हणून म्युच्युअल फंडमधील सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे अनेक जण गुंतवणूक करतात. एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा दरमहा छोटी रक्कम गुंतवून दीर्घ कालीन गुंतवणुकीद्वारे चांगला निधी उभारु शकता. म्युच्युअल फंड जाणकारांच्या मते भारतीय इक्विटी बाजारात चांगली संपत्ती निर्माण करण्याचा चांगला मार्ग म्हणून एसआयपीचा पर्याय चांगला आहे. मात्र, काही वेळा शेअर बाजारात घसरण झाल्यास गुंतवणूकदार एसआयपी बंद करुन गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा विचार करु शकतात. या प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागू शकतं, त्यामुळं काही चुका टाळणं गरजेचं आहे.

बाजारातील घसरणीवेळी एसआयपी बंद करणं

शेअर बाजारातील घसरणीवेळी एसआयपी बंद करु नये. एसआयपी दीर्घ कालीन गुंतवणुकीद्वारे वेल्थ क्रिएट करण्याचा यशस्वी पर्याय आहे. एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात रुपी कॉस्ट अवरेजिंगचा लाभ देतो. यामुळं बाजार घसरतो त्यावेळी कमी नेट असेट वॅल्यूवर जास्त यूनिट खरेदी करता येतात. जेव्हा बाजार घसरतो त्यावेळी काही गुंतवणूकदार एसआयपी बंद करतात. त्यामुळं एसआयपी तेजी मंदीच्या काळात चांगली कामगिरी करते. 

वित्तीय ध्येय लक्षात न ठेवणं

एसआयपी करताना फायनान्शिअल गोल लक्षात घेणं आवश्यक आहे. तुमचं लक्ष संपत्ती निर्माण करणे, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा रिटायरमेंटसाठी पैशांचं नियोजन करणं आवश्यक असतं. त्यानुसार फंडची निवड करावी. योग्य फंडची निवड तुम्हाला चांगला आणि स्थिर परतावा देतो. 

नियमितपणे एसआयपीमध्ये वाढ न करणं

एसआयपी सुरु केल्यानंतर जसं जसं तुमचं उत्पन्न वाढतं त्यानुसार वेल्थ क्रिएशन अधिक करण्यासाठी एसआयपीच्या रकमेत वाढ करणं आवश्यक आहे. एसआयपी स्टेपअपचा वापर न केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं एसआयपी सुरु केल्यानंतर दरवर्षी किमान 10 टक्के स्टेप एसआयपी करणं आवश्यक आहे. 

एसआयपी मध्येच बंद करणं

चांगला कॉर्पस किंवा फंड जमा करायचा असल्यास एसआयपीद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करणं आवश्यक असतं. दीर्घकालीन गुंतवणुकीत कम्पाऊंडिंगचा लाभ मिळतो. शॉर्ट टर्ममध्ये किंवा आर्थिक संकटाच्या काळात  एसआयपी बंद करणं समजूतदारपणाची गोष्ट नाही.तुम्ही एसआयपी स्थगित करण्याचा पर्याय वापरु शकता. काही म्युच्युअल फंड एसआयपी स्थगित करण्याचा पर्याय देतात. 

एसआयपी लवकर बंद करणं

एसआयपीद्वारे वेल्थ क्रिएशन करायचं असल्यास दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक असते. गुंतवणूकदारानं चांगल्या परताव्यासाठी धीर बाळगणं आवश्यक आहे. एसआयपी सुरु केल्यानंतर एक ते दोन वर्षात चांगल्या परताव्याची अपेक्षा करणं, एसआयपी लगेचच बंद केल्यास चांगला परतावा मिळत नाही. एसआयपी 5 ते  10 वर्ष गुंतवणूक सुरु ठेवल्यास चांगला फायदा होतो. 

चुकीच्या फंडची निवड करणे

म्युच्युअल फंडची यापूर्वीची कामगिरी, फंड मॅनेजरचं कौशल्य, जोखमीची क्षमता याचा विचार न करता एसआयपीमध्ये गुंतवणूक करणं कमी रिटर्नचं कारण बनू शकतं. 

टॅक्सचा विचार न करणं

काही गुंतवणूकदार एसआयपी सुरु करताना कराशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळं त्यांना मिळणाऱ्या रिटर्नवर परिणाम होऊ शकतो. एका वर्षाच्या आत म्युच्युअल फंडमधून रक्कम काढल्यास एटीसीजी तर एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सव्वा लाखापेक्षा अधिक रक्कम काढल्यास एलटीसीजी लागू होतो. त्यामुळं यासंदर्भातील माहिती देखील जाणून घेणं आवश्यक असतं. याकडे दुर्लक्ष केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. 

फंड्स वारंवार बदलणे

एखाद्या फंडमध्ये सहा महिने किंवा एका वर्षाच्या कालावधीत चांगला परतावा मिळाला नाही तर फंडमधून एक्झिट घेतल्यास एक्झिट लोड आणि कर भरावा लागू शकतो. एखाद्या फंडमध्ये किमान पाच वर्ष एसआयपी सुरु ठेवावी. 

मागील कामगिरीच्या आधारे फंड निवडणं

म्युच्युअल फंडमध्ये मागील कामगिरी भविष्यातील फंडच्या कामगिरीबाबत गॅरंटी देता येत नाही. एसआयपी करताना अनेक जण ही चूक करत असतात. मागील कामगिरी पाहून पैसे गुंतवतात. त्यामुळं फंड निवडताना त्याचं ट्रॅक रेक़र्ड, रिस्क प्रोफाईल आणि गुंतवणूक रणनीती समजून घ्यावी. 

आपत्कालीन खर्चासाठी फंड तयार करणे

तुम्ही जेव्हा एसआयपी सुरु करता तेव्हा तुमच्याकडे आपत्कालीन कारणांसाठी स्वतंत्र निधी असणं आवश्यक असतं. काही कारणांमुळं पैशांची गरज लागल्यास आपत्कालीन फंडमधून त्याचा वापर करावा. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीवर आधारित असते. त्यामुळं बाजारासंदर्भात योग्य संशोधन करुन आपल्या गरजेनुसार एसआयपी सुरु करण्यासाठी योग्य फंड निवडावा.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)