नवी दिल्ली : गुंतवणुकीच्या लोकप्रिय प्रकारांपैकी एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक हा लोकप्रिय प्रकार आहे. एसआयपी सुरु करताना ती किती रकमेची केलीय याचा फार विचार करु नये. अनेकांना मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यास मोठा फंड तयार होईल, असं वाटतं. बचत आणि गुंतवणूक छोटी असो किंवा मोठी ती योग्य वेळी केली पाहिजे. वित्तीय सल्लागारांच्या मते जितक्या लवकर गुंतवणूक करणं शक्य होईल तितक्या लवकर सुरुवात केली पाहिजे. गुंतवणूक आणि बचतीची सवय व्यक्तीला असली पाहिजे. करिअरच्या सुरुवातीला तुम्ही गुंतवणूक आणि बचतीचं महत्त्व समजून घेतल्यास निवृत्तिनंतरचं जीवन चिंतामुक्त बनू शकतं.

नोकरी लागल्यानंतर लगेचच गुंतवणूक सुरु केल्यास कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. कम्पाऊंडिंगचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होतो. उदा. एखादा व्यक्ती वयाच्या 25 व्या वर्षी दरमहा 3000 रुपयांची एसआयपी सुरु करत असेल आणि ती पुढं 35 वर्ष कायम ठेवत असेल तर त्याला निवृत्तीनंतर 5 कोटींचा निधी मिळेल.

समजा दिनेश नावाच्या तरुणाचं वय 25 वर्ष आहे, त्यानं तेव्हापासून दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक सुरु केल्यास आणि त्याला 15 टक्के सीएजीआरनं वार्षिक परतावा मिळाला तर मोठा फायदा होऊ शकतो.

दिनेशनं वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक सुरु केल्यास, त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी 35 वर्षांचा कालावधी मिळेल. 15 टक्के सीएजीआरनं वार्षिक परतावा अपेक्षित ठेवत 3000 रुपयांची गुंतणूक सुरु केल्यास आणि दरवर्षी 5 टक्के टॉप अपनं रक्कम वाढवत गेल्यास दिनेश 35 वर्षात 32 लाख 51 हजार 530 रुपयांची गुंतवणूक करेल. त्याला 35 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर त्याच्याकडे एकूण 5.7 कोटी रुपयांचा कॉर्पस तयार असेल.

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे तुम्ही दरमहा ठराविक तारखेला निश्चित रकमेची गुंतवणूक करु शकता. तुम्ही जितक्या रकमेची गुंतवणूक करता तितकी रक्कम तुमच्या खात्यातून ऑटो पे पर्याय ऑन असेल तर दरमहा वजा होऊन म्युच्युअल फंडमध्ये जमा होत असते. तुमची गुंतवणूक जितकी दीर्घकाळ असेल तितका त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार एसआयपी सुरु करु शकता.

एसआयपी सुरु केल्यानंतर प्रत्येक वर्षी निश्चित रक्कम वाढवली पाहिजे. तुम्ही दरवर्षी स्टेपअप करत एसआयपीची रक्कम वाढवली पाहिजे. समजा, 3000 रुपयांची एसआयपी सुरु केल्यास 13 व्या महिन्यात एसआयपीची रक्कम पुढच्या वर्षात 5 ते 10 टक्क्यांनी वाढवावी. दरवर्षी 5 ते 10 टक्के रक्कम स्टेपअप केल्यास गुंतवणूकदरांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा फायदा होऊ शकतो.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)