नवी दिल्ली : देशात मागील 18 महिन्यांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी कोणतीही वाढ केली नाही. तर, दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) चढ-उतार सुरू आहे. अशा स्थितीत एका ऑईल कंपनीने भारतात डिझेलचे दर वाढवले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीने 20 रुपयांची वाढ केली आहे.
'शेल इंडिया' (Shell India) या खासगी कंपनीने डिझेलचे दर वाढवले आहे. भारताच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील बाजारपेठेत शेल इंडिया कंपनीच्या इंधनाची चांगली विक्री होते. देशभरात या कंपनीचे 346 पेट्रोल पंप आहेत.
'शेल इंडिया'च्या पंपावर डिझेलची किंमत किती आहे?
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान शेल इंडियाने एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत डिझेलच्या दरात 20 रुपयांनी वाढ केली आहे. शेल इंडियाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या वाढीनंतर त्याच्या पेट्रोल पंपांवर डिझेलची किंमत मुंबईत 130 रुपये आणि चेन्नईमध्ये 129 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याचबरोबर शेल पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर 117 ते 118 रुपये प्रतिलिटर आहे. शेल पेट्रोल पंपावर डिझेलच्या दरात आणखी चार रुपयांनी वाढ होणार असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने काय उत्तर दिले?
कंपनीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "शेल इंडियाने डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांची चिंता समजते. परंतु बाजारातील सततच्या चढ-उतारामुळे आम्ही डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर आहे. त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची तेल आणि वायू कंपनी असलेल्या शेलच्या भारतीय युनिट शेल इंडियाने गेल्या आठवड्यात इंधनाच्या दरात प्रतिदिन 4 रुपयांनी वाढ केली.
सरकारी ऑईल कंपनीकडून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 18 व्या महिन्यात किमती नियंत्रणात ठेवल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोलच्या किमती शेल इंडिया पंपांवर विकल्या जाणाऱ्या दरांपेक्षा खूपच कमी आहेत. देशातील बहुतांश भागात, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या IOC, BPCL आणि HPCL द्वारे पेट्रोल, डिझेलची विक्री होते. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर चेन्नईत 102.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. या कंपन्यांचे एकूण 79,204 पेट्रोल पंप देशभरात आहेत.