Share Market Updates : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची काहीशी सकारात्मक सुरुवात झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही निर्देशांक वधारले. 


शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 58,530.73 अंकावर सुरू झाला. त्यानंतर शेअर बाजारात खरेदीचा ट्रेंड दिसण्यास सुरुवात झाली. सकाळी 9.26 वाजता 91.65 अंकांनी वधारत  58,660.16 अंकावर ट्रेड करत होता. सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 265 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीत 74.80 टक्क्यांनी वधारला होता. 


निफ्टीत तेजी 


निफ्टीमध्ये व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारात व्यवहार सुरू झाले तेव्हा 17,436.90 अंकावर ट्रेड करत होता. त्यानंतर 9.30 वाजण्याच्या सुमारास 4.90 अंकांनी वधारला. 


जागतिक शेअर बाजारात स्थिती काय?


गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबद्दल चिंता कायम आहे. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3,088.73 कोटी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी  1,145.28 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले होते. त्यामुळे बाजार काही प्रमाणात सावरला होता. 


एनटीपीसीच्या शेअर दरात वाढ


सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसीच्या समभागात सर्वाधिक वाढ झाली. कंपनीचा समभाग 3.67 टक्क्यांनी वधारला. तर, टायटनच्या शेअर दरात 1.19 टक्क्यांनी घट झाली. एसबीआय लाइफच्या शेअरमध्ये 2.28 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. 


गुरुवारी काय होता ट्रेंड?


गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 116 अंकांनी तर,  निफ्टीही 38 अंकानी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 0.20 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,567 अंकावर तर निफ्टीमध्ये 0.22 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,460 वर बंद झाला. बाजार बंद होताना FMCG आणि रिअॅलिटी सेक्टरमध्ये चांगली तेजी दिसून आली. त्याचवेळी फार्मा, आयटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील शेअर वधारले.