Share Market Updates: भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. आशियाई शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला.
देशांतर्गत बाजारावरील दबाव प्री-ओपन सत्रातूनच स्पष्टपणे दिसून आला. प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स सुमारे 370 अंकांनी घसरला होता. सिंगापूरमध्ये SGX निफ्टी 0.69 टक्क्यांनी घसरला. सकाळी 09:15 वाजता सत्र सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 480 अंकांनी घसरला. त्यानंतरच्या काही मिनिटांच्या व्यवहारात बाजाराची घसरण थोडी कमी झाली. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स सुमारे 320 अंकांनी घसरला होता आणि 60,000 अंकांवरून सुमारे 150 अंकांनी खाली आला होता. निफ्टी देखील 75 पेक्षा जास्त अंकांनी खाली 117,890 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता.
आज बुधवारी, शेअर बाजारावर दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे. याआधी मंगळवारी शेअर बाजारात नफेखोरी दिसून आला. मंगळवारी बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स 435.24 अंकांनी (0.72 टक्के) घसरून 60,176.50 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीही 96 अंकांच्या (0.53 टक्के) घसरणीसह 18 हजार अंकांच्या खाली घसरला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, शेअर बाजार वधारला होता. सोमवारी सेन्सेक्स 1,335.05 अंकांनी म्हणजेच 2.25 टक्क्यांनी वधारत 60,611.74 वर आणि निफ्टी 382.95 अंकांनी (2.17 टक्के) वधारत 18,053.40 वर बंद झाला.
एनर्जी, मेटल्स वगळता इतर सर्व क्षेत्रातील निर्देशांकात घसरण होत असल्याचे चित्र आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तेजी सुरू आहे. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, फार्मा सारख्या क्षेत्रात घसरण असल्याचे दिसून येत आहे.