मुंबई : जागतिक बाजारातील चांगल्या स्थितीमुळं भारतीय शेअर बाजारात देखील चांगले परिणाम दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह खुला झाला. बीएसईवर सेन्सेक्सनं 76000 चा टप्पा पार केला. 350 अंकांच्या तेजीसह सेन्सेक्सनं 76257 चा टप्पा गाठला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचवर निफ्टी देखील 23 हजारांच्या वर आहे. निफ्टीमध्ये 93 अंकांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामध्ये तेजीचं वातावरण दिसत आहे. शेअर बाजारातील तेजीमुळं साधारणपणे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत  5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईवरील लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 414 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 


 
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 2975 शेअरच्या ट्रेडिंग पैकी 2162 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर 699 शेअरमध्ये घसरण झाली. 100 स्टॉक्सला लोअर सर्किट लागलं तर  63 कंपन्यांच्या स्टॉक्सला अप्पर सर्किट लागलं. सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी  19 स्टॉक्स तेजी तर 11 स्टॉक्समध्ये घसरण झालेली दिसून आली. तेजी असणाऱ्या शेअरमध्ये इन्फोसिस झोमॅटो,  टिसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा स्टील यांचा समावेश आहे. तर, नेस्ले, एचयूएल, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, आयटीसी आणि भारती एअरटेलच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली. 



भारतीय शेअर बाजारासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स 870 अंकांच्या तेजीसह 52350 अंकांवर पोहोचला. निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स  300 अंकांनी वाढून 16331 वर पोहोचला आहे. याशिवाय बाजारत तेजी असल्यानं माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आयटी इंडेक्स  800 अंकांनी वाढला आहे. 


अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना आशा 


सेन्सेक्समध्ये तेजीचं कारण हे देखील आहे की गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पातून त्यांना आशा आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही पावलं उचलली जाऊ शकतात. त्यामुळं बाजाराला मजबुती मिळेल. सेन्सेक्समधील तेजीला बजेटपूर्व रॅलीशी जोडून पाहायलं जात आहे. याशिवाय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली, त्यामुळे आता खेरदीचा वेळ आहे. यामुळं शेअर बाजारात सुधारणा होईल, अशी आशा आहे.


इतर बातम्या : 



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)