मुंबई : भारतीय शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीला नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रेक लागला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी एका दिवसात 10 लाख कोटींची कमाई केली आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, त्यावेळी एका दिवसात गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. आज ते नुकसान भरुन निघाल्याचं पाहायला मिळतंय.  

Continues below advertisement

भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज तेजी पाहायला मिळाली.  आज भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षातील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळं गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे लावले.

Share Market : शेअर बाजारात तेजी 

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक राहिली. निफ्टी 50 निर्देशांक 22900 च्या वर खुला झाला. आज पूर्ण दिवसभर शेअर बाजारात खरेदीचं वातावरण पाहायला मिळालं. बीएसई सेन्सेक्स आज 1186.77 अंकांच्या तेजीसह 73134.32 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 348 अंकांच्या तेजीसह 22679.40 वर बंद झाला. 

Continues below advertisement

शेअर बाजारातील ब्रॉडर मार्केटचा विचार केला असता स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअरमध्ये मोठी खरेदी दिसून आली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 2.2 टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 3.3 टक्क्यांनी वाढला. सर्व सेक्टोरल निर्देशांक तेजीसह बंद झाले. 

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य आज 422.23 लाख कोटींवर पोहोचलं आहे. सोमवारी बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 412.41 लाख कोटींवर होतं. म्हणजेच भारतीय शेअर बाजारातील बीएसईवर लिस्ट  असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 9.82 लाख कोटींनी वाढलं आहे. म्हणजेच आज गुंतवणूकदारांनी 9.82 लाख कोटींची कमाई केली आहे. 

भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी 25 शेअरमध्ये तेजी दिसून आली. सर्वाधिक तेजी ट्रेंटच्या शेअरमध्ये दिसून आली. यानंतर इंडिगो, अदानी पोर्टस, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची शेअरमध्ये अधिक तेजी दिसून आली. तर, एनटीपीसी, सन फार्मा, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट आणि भारती एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. 

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 44 लाख कोटींनी घटलं होतं.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)