Continues below advertisement


मुंबई: भारतीय शेअर बाजारात 17 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत तेजी आणि घसरणीचं सत्र पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कधी तेजी तर कधी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील सेन्सेक्स निर्देशांकातील टॉप 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांची संपत्ती 5 दिवसात 36000 कोटी रुपयांनी वाढली आहे.


भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचं बाजारमूल्य 1.28 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे.सर्वाधिक फायदा भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनींच्या गुंतवणूकदारांना झाला आहे. यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, हिंदूस्थान यूनीलीव्हरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. बजाज फायनान्स, भारतीय जीवन विमा निगम आणि आयसीआयसीआय बँकेच्या बाजारमूल्यात घट झाली.


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये आठवड्याच्या सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली. रिलायन्सच्या शेअरनं 1557.80 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर शुक्रवार पर्यंत रिलायन्सचा शेअर 1543 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 20.92 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर, रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसात 36673 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांनी देखील या पाच दिवसात 36579 कोटी रुपयांची कमाई केली. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 12.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.


इन्फोसिसचं बाजारमूल्य 17490 कोटी रुपयांनी वाढलं आहे. टीसीएसचं बाजारमूल्य 16299 कोटी रुपयांनी वाढलं. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 14608. 22 कोटी रुपयांनी वाढलं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजामूल्यात 4846.08 कोटी रुपयांची वाढ झाली. हिंदूस्थान यूनीलीव्हरचं बाजारमूल्य 1785.69 कोटी रुपयांनी वाढलं.


बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 8244 कोटी रुपयांनी घसरुन 6.25 लाख कोटी रुपयांवर आलं. एलआयसीच्या बाजामूल्यात देखील घसरण होऊन ते 5.70 लाख कोटींवर आलं. आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांचं 1248.08 कोटी रुपयांचं नुकसान झालं.


रिलायन्स प्रथम क्रमांकावर


रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारमूल्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदूस्थान यूनिलीवर आणि एलआयसी क्रम बाजारमूल्यानुसार आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)