मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून समभाग विक्री करुन 2025 मध्ये 97000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. गेल्या दहा वर्षातील भारतीय शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात यावर्षी झाली आहे. नववर्षातील पहिल्या सहा आठवड्यांमध्ये विदेसी गुंतवणूकारांनी  97000 कोटी रुपये काढून घेतल्यानं देशांतर्गत गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून समभागांची विक्री करण्यात येत आहे, याला अनेक कारणं जबाबदार आहेत. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या आयात कर लावण्याच्या घोषणेनं डॉलर मजबूत झाला तर रुपया कमजोर झाला आहे. यामुळं विदेशी गुंतवणूकदार विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांऐवजी अमेरिकेकडे आकर्षित होत आहेत. 

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सुरु असलेल्या विक्रीमुळं निफ्टी 2.6 टक्क्यांनी, निफ्टी मिडकॅप 11 टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप 15 टक्क्यांनी घसरलं आहे. 2016 नंतर पहिल्यांदा पहिल्या सहा आठवड्यांमध्ये निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. 

विकसित होणाऱ्या देशांच्या शेअर बाजारापैकी सर्वाधिक विक्री भारतीय शेअर बाजारातून करण्यात आली आहे.चीननं त्यांच्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी जी पावलं उचलली आहेत. त्याचा परिणाम होऊन गुंतवणूकदार चीनकडे वळले आहेत. ऑक्टोबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा ट्रेंड सुरु झाला आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवल्यानंतर जगभरात चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर टॅरिफ लादल्याची घोषणा केल्यानंतर जगभरात त्याचे नकारात्मक पडसाद पाहायला मिळाले.

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून आलं. याचा परिणाम देखील भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. याशिवाय तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांची कामगिरी देखील अपेक्षेप्रमाणं नसल्यानं भारतीय शेअर बाजार घसरत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं तिसऱ्या तिमाहीनंतर 7 फेब्रुवारीला पतधोरण जाहीर केलं. संजय म्हलोत्रा यांनी रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करत 6.25 टक्के केला. त्यामुळं कर्ज स्वस्त होऊन अर्थव्यवस्था वेग पकडण्याची शक्यता आहे. 

इतर  बातम्या :

 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)