नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी भारतावर लादलेले टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणत असल्याची घोषणा केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. शेअर बाजारात जोरदार तेजी आज पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 2400 अंकांची आणि निफ्टीमध्ये 700 अंकांची तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील या तेजीमुळं गुंतवणूकदारांनी 20 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.
20 लाख कोटींची कमाई
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर सहमती झाल्याची माहिती दिली. याशिवाय टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापर कराराचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी आली. बीएसईचं बाजारमूल्य आज 20 लाख कोटींनी वाढलं आहे. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचं बाजारमूल्य 455 लाख कोटी होतं. आज बीएसईचं बाजारमूल्य 474 लाख कोटींवर पोहोचलं म्हणजेच गुंतवणूकदारांनी 20 लाख कोटी रुपयांची कमाई केली.
अमेरिकेनं टॅरिफ घटवल्यानं भारतातील वाहन, वस्त्रोद्योग, अंभियांत्रिकी वस्तू, केमिकल फार्मा, आयटी आणि सी फूड क्षेत्राला फायदा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत ट्रम्प यांनी घोषणा केल्यानं भारतीय रुपया देखील मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 90.40 रुपयांवर खुला झाला.
सोने आणि चांदीच्या घसरणीला ब्रेक
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु होती. चांदीचे दर 1 लाख 70 हजारांनी कमी झाले होते. आज 5 मार्चच्या वायद्याच्या चांदीचे दर 257480 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी चांदीचा दर 236261 रुपये किलो होता. म्हणजेच चांदीच्या दरात 21000 रुपयांची वाढ झाली आहे. 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे दर देखील 5494 रुपयांनी वाढून 149485 रुपये किलोवर आले आहेत.
शेअर बाजारात या शेअरमध्ये तेजी
भारतीय शेअर बाजारात अदानी पोर्टस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स,इटरनल, बजाज फिनसर्व्ह, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, इन्फोसिस, टायटन आणि मारुतीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)