मुंबई : भारतीय शेअर बाजारात 23 जानेवारीला मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेअर बाजारात सर्वत्र घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्समध्ये 769.66 अंकांची घसरण होत निर्देशांक 81537.70 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 241.25 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 25048.65 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

Continues below advertisement

स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.56 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 2.19 टक्क्यांनी घसरला. यूटिलिटी, रिअल्टी शेअरचा निर्देशांक 3 टक्क्यांनी घसरला. सार्वजनिक बँका, कॅपिटल गुड्स आणि पॉवर शेअरचे निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरला. 

तज्ज्ञांच्या मते विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली विक्री, तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांचे कमजोर निकाल, रुपयातील मोठी घसरण आणि जागतिक अनिश्चिततांमुळं गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाले. 

Continues below advertisement

गुंतवणूकदारांचे 6.92 लाख कोटी बुडाले

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 451.60 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. गुरुवारी या बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य  458.62 लाख कोटी रुपये झालं होतं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य एका दिवसात 6.92 लाख कोटी रुपयांनी कमी झालं. म्हणजेच गुंतवणूकदारांचे 6.92 लाख कोटी रुपये बुडाले. 

सेन्सेक्सवरील टॉप 30 कंपन्यांच्या शेअर पैकी 7 शेअरमध्ये तेजी दिसून आली. टेक महिंद्राच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. हिंदुस्तान यूनिलीवर, इन्फोसिस, एशियन पेंटस, टीसीएसचे शेअर तेजीसह बंद झाले. तर, 23 शेअर घसरणीसह बंद झाले आहेत. यात अदानी पोर्टस, इटरनल, इंडिगो, एक्सिस बँक, बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये घसरण झाली.

बीएसईवर घसरणीसह बंद झालेल्या शेअरची संख्या अधिक राहिली. बीएसईवर 4361 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. त्यात 1329 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 2879 शेअरमध्ये घसरण झाली. तर, 153 शेअर तेजी किंवा घसरणीशिवाय बंद झाले. 75 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 409 स्टॉक्सनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला. 

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरु असलेल्या विक्रीच्या सत्राचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 2549.80 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर, जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 36000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. याशिवाय कच्चा तेलाच्या किमती वाढणं, भूराजनैतिक अनिश्चितता वाढणं, अदानी ग्रुपच्या शेअरमधील घसरण, बँकिंग स्टॉक्सची कमजोर कामगिरी आणि रुपयातील घसरण यामुळं शेअर बाजारावर परिणाम दिसून आली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)