Share Market Today  मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (6 ऑगस्ट) रोजी जोरदार घसरण झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 5.5 टक्के ठेवण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ संदर्भात वारंवार इशारे देणं सुरु ठेवलं आहे. यामुळं गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या आहेत. बीएसई सेन्सेक्स 166.26 अकांनी म्हणजेच 0.21 टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्स 80543.99 अंकांवर पोहोचला आहे.  निफ्टी 50  निर्देशांकात 75.35 अंकांनी म्हणजेच  0.31 टक्क्यांनी घसरुन 24574.20 अंकांवर आला आहे.  

ब्रॉडर मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळतं. बीएसई मिडकॅप इंडेक्स 1 टक्क्यांची आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.14 टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. बँकिंग सोडलं तर इतर सेक्टोरल निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक विक्री आयटी, फार्मा, रिअल्टी शेअरमध्ये पाहायला मिळाली. 

गुंतवणूकदारांचे 2.88 लाख कोटी बुडाले

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 445.08 लाख कोटी रुपयांवर आलं. मंगळवारी सेन्सेक्सवरील लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 447.96 लाख कोटी रुपयांवर होतं. म्हणजेच एका दिवसात बाजारमूल्य 2.88 लाख कोटी रुपयांनी घसरलं. यानुसार गुंतवणूकदारांचं 2.88 लाख कोटी रुपयांचं नुकसान एकाच दिवसात झालं असं म्हणता येईल. 

बीएसई सेन्सेक्सवरील टॉप 30 कंपन्यांपैकी 11 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 19 स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली. एशियन पेंटसच्या स्टॉकमध्ये 2.19 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंट, अदानी पोर्टस मध्ये तेजी पाहायला मिळाली. 

सेन्सेक्सवरील ज्या 19 स्टॉकमध्ये घसरण झाली त्यामध्ये सन फार्मामध्ये सर्वाधिक घसरण झाली. टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नोलॉजीज या स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली. 

सेन्सेक्सवरील 4204 स्टॉक पैकी 1352 स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर, 2697 स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली. 155 स्टॉकमध्ये घसरण किंवा तेजी पाहायला मिळाली नाही. 242 स्टॉकला अप्पर सर्किट लागलं तर 234 स्टॉकला लोअर सर्किट लागलं. 117 स्टॉकनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 131 स्टॉकनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार त्यांची भागीदारी विकत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)